पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकीच्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. तब्बल 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारतीय हॉकी संघ यापूर्वीच उपांत्यपूर्व सामन्यात दाखल झालाय. मात्र या विजयामुळं त्यांचा आत्मविश्वास बळावला असेल. या सामन्यात भारतासाठी अभिषेक आणि हरमनप्रीत सिंग यांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकललं. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी 3 सामने जिंकले, 1 सामना अनिर्णित राहिला आणि 1 सामना गमावला.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचं वर्चस्व : या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये 12व्या मिनिटाला अभिषेकनं भारतीय संघासाठी अप्रतिम मैदानी गोल केला. ऑस्ट्रेलियन गोलकीपर थॉमस क्रेगकडं त्याच्या शानदार शॉटचं उत्तर नव्हतं. यासह त्यानं भारताचा स्कोअर 1-0 असा केला. यानंतर सामन्याच्या 13व्या मिनिटाला भारतानं पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि कर्णधार हरमनप्रीतनं अप्रतिम शॉट मारत भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. या सामन्याच्या 15व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टॉमनं शॉट घेत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारताचा गोलरक्षक श्रीजेशनं त्याला वाचवलं. यासह भारतानं पहिल्या क्वार्टरचा शेवट 2-0 असा केला.