Paris Olympics 2024 Opening Ceremony :बहुप्रतिक्षित पॅरिस ऑलिम्पिक 2024ची सुरुवात शानदार उद्घाटन सोहळ्यानं झाली. या ऐतिहासिक सोहळ्यात 206 एसोसिएशन आणि विविध देशांचे 10,500 खेळाडू सहभागी झाले. हा सोहळा पाहण्यासाठी सीन नदीच्या काठावर 3 लाखांहून अधिक प्रेक्षक विक्रमी संख्येनं उपस्थित होते.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा सीन नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला. ग्रीक संघानं प्रथम बोटीतून ऑलिम्पिक समारंभात प्रवेश केला. ग्रीक खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
भारतीय खेळाडू पारंपरिक पोशाखात :ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा संघ 84 व्या क्रमांकावर आला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलनं भारताचा ध्वज फडकावला. भारतीय खेळाडूंनी यावेळी पारंपरिक पोशाख परिधान केला. यावेळी पीव्ही सिंधूंसह भारताच्या महिला खेळाडूंनी साडी परिधान करत सर्वांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं. या बोटीवर भारतासह इंडोनेशिया आणि इराणचे ऑलिम्पिक संघही उपस्थित होते.
3 वेळा ऑलिम्पिक आयोजित करणारं दुसरं शहर : फ्रेंच शहर पॅरिस 100 वर्षांनंतर जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करत आहे. हे शहर आता लंडननंतर तीनदा ऑलिम्पिक आयोजित करण्याचा मान मिळवणारं जगातील दुसरं शहर बनलं आहे.
उद्घाटन समारंभात विशेष काय होतं? :ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळा पार पडला. बोटीतून 6 किमी लांबीच्या 'परेड ऑफ नेशन्स'मध्ये जगभरातील 10,500 खेळाडूंनी भाग घेतला. या समारंभात अनेक कलाकारांनी परफॉर्म केलं. पॉप स्टार लेडी गागा, यात अया नाकामुरा हिनं पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा : पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलं, "पॅरिस ऑलिम्पिक सुरू होत आहे. भारतीय दलाला माझ्या शुभेच्छा. प्रत्येक खेळाडू हा भारताचा अभिमान आहे. ते सर्व चमकावेत आणि खऱ्याखुऱ्या खिलाडूवृत्तीला मूर्त रूप देतील, त्यांच्या असामान्य कामगिरीनं आम्हाला प्रेरणा द्यावी. #Paris2024," पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमातील पोस्टमध्ये लिहिलं.
हेही वाचा
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज हे भारतीय खेळाडू दाखवणार प्रतिभा; कधी होणार सामने, वाचा सविस्तर - Paris Olympics 2024
- यंदाच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चांगलं यश मिळेल; ऑलिम्पिक नेमबाज अंजली भागवत यांना विश्वास - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाच्या आधी फ्रान्समध्ये मोठा गोंधळ; हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये तोडफोड, रेल्वेसेवा विस्कळीत - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ड्रॉ जाहीर; स्टार बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिनासमोर कडवं आव्हान - Paris Olympics 2024