नवी दिल्ली Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेटमध्ये आता बदल सामान्य झाला आहे. प्रत्येक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कारवाईत करतो. असंच काहीसं इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील दारुण पराभवानंतर पाहायला मिळालं. दुसऱ्या कसोटीपूर्वी पीसीबीनं आता नवीन निवडकर्त्यांची घोषणा केली आहे. पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध एक डाव 47 धावांनी मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला.
मुलतानमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव : पाकिस्तान संघाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. बांगलादेशकडून झालेल्या ऐतिहासिक पराभवाची चर्चा संपत नव्हती तोच इंग्लंडनं घरात प्रवेश करत पाकिस्तान संघाचा पराभव केला. इंग्लंडनं हा सामना 47 धावा आणि एका डावानं जिंकला. विशेष म्हणजे पाकिस्ताननं पहिल्या डावात 550 हून अधिक धावा करुनही त्यांना अशा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर पीसीबीनं पुढील सामन्यापूर्वी मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं चार नवीन निवडकर्त्यांची नावं जाहीर केली.
अंपायरला बनवलं निवडकर्ता : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. माजी पाकिस्तानी पंच अलीम दार यांच्या नावाचाही चार निवडकर्त्यांमध्ये समावेश आहे. त्यांनी अलीकडेच अंपायरिंगला निरोप दिला होता. आता ते पाकिस्तान संघाचे सिलेक्टर झाले आहेत.
चार निवडकर्त्यांचा समावेश : पाकिस्तानच्या चार निवडकर्त्यांच्या यादीत अलीम दार, माजी अनुभवी गोलंदाज आकिब जावेद, अझहर अली आणि हसन चीमा यांचा समावेश आहे. अलीकडंच मोहम्मद युसूफनं पाकिस्तान संघाची खराब अवस्था पाहून पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळं पाकिस्तान चांगल्या निवडकर्त्यांच्या शोधात होता. आता हे चार निवडकर्ते पाकिस्तान क्रिकेटमधील बदलाचा दुवा बनू शकतील की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :
- पाकिस्तानच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम... 147 वर्षात 'असं' घडलंच नव्हतं
- इंग्लंडविरुद्ध मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तान WTC गुणतालिकेत खालून पहिला; भारत कितव्या स्थानी?
- 823/7... इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उभारला धावांचा हिमालय; क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात 'असं' फक्त चारवेळा झालं