मुलतान PAK Beat WI by 127 Runs : पाकिस्तान क्रिकेट संघानं इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी सामन्यात सुरु केलेली विजयी मालिका वेस्ट इंडिजविरुद्धही सुरु ठेवली आहे. त्यांनी मुलतान कसोटी 127 धावांनी जिंकली आहे. या सामन्यातही इंग्लंड मालिकेप्रमाणे पाकिस्तानी फिरकीपटूंची जादू पुन्हा एकदा दिसून आली. वेस्ट इंडिजच्या सर्व 20 विकेट्स फक्त फिरकीपटूंनी घेतल्या. दरम्यान, पाकिस्तानी फिरकी जोडी साजिद खान आणि नोमान अली यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. या सामन्यात त्यांनी मिळून एकूण 15 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्तान संघानं 251 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 123 धावांवर ऑलआउट झाला.
कमी धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय : वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये आला आहे. त्यांचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला, जो कमी धावसंख्येचा होता. दोन्ही संघांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संपूर्ण सामन्यात फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. 17 जानेवारी रोजी सुरु झालेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौद साकिबच्या 84 धावा आणि मोहम्मद रिझवानच्या 71 धावांच्या जोरावर पाकिस्ताननं कशा तरी 230 धावा केल्या.
पहिल्या डावात पाकिस्तानची आघाडी : यानंतर प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 137 धावांवर गारद झाला आणि पाकिस्तानला 93 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं 157 धावा केल्या आणि एकूण 251 धावांचं लक्ष्य ठेवलं. यादरम्यान कर्णधार शान मसूदनं 70 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी केली. याचा पाठलाग करताना कॅरिबियन संघ 123 धावांवर सर्वबाद झाला आणि पाकिस्ताननं 127 धावांनी सामना जिंकला.