छत्रपती संभाजीनगर : पैठणी जिंकण्यासाठी महिलांसाठी अनेक खेळ आयोजित केले जातात, त्यात मनोरंजन करण्याचा हेतू असतो. मात्र, शहरात असाच एक खेळ घेऊन महिलांसाठी पारितोषिक देण्यात आलं. यावेळी या खेळात वाहतूक ज्ञान देण्याचा उद्देश होता. धक्कादायक बाब म्हणजे, नेहमी गाडी चालवणाऱ्या महिलांना चक्क अनेक नियम माहिती नसल्याचं वास्तव समोर आलं. अपघात कसा होऊ शकतो? त्याला काय कारण? ते कसं टाळता येऊ शकतं? याबाबत जनजागृती करण्यात आली. संक्रांतीनिमित्तानं वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने आणि श्री गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती आयोजक किरण दळवी यांनी दिली.
राबवण्यात आली अनोखी स्पर्धा : महिलांसाठी अनेक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पारितोषिक देऊन मनोरंजन करण्याचा हेतू समोर ठेवला जातो. मात्र, शहरातील जळगाव रस्त्यावर वाहतूक पोलीस आणि श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल तर्फे अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खेळ जुनेच मात्र, त्यात वाहतूक नियमांची माहिती देण्याच्या उद्देशाने यावर्षी ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. खेळाच्या माध्यमातून महिलांमध्ये वाहतुकीबाबत किती ज्ञान आहे किंवा त्या किती जागरूक आहेत याबाबत आढावा घेण्यात आला. खेळ खेळत असताना महिलांना गाडी चालवत असताना रस्त्यावर काही चिन्ह दर्शवण्यात आले, त्यांचा अर्थ काय असतो किंवा त्या काय सूचना असतात याबाबत प्रश्न विचारण्यात आले. ज्या महिलांना अचूक उत्तरे देता आली अशा महिलांना पारितोषिक म्हणून पैठणीसह इतर पारितोषिक देण्यात आले. या खेळात जवळपास तीनशे महिलांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती आयोजक किरण दळवी यांनी दिली.
एका प्रश्नानं आणली रंगत : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक विनोद या कार्यक्रमाचा आकर्षण ठरला. एक पूल आहे. या पुलावरुन महिला गाडी चालवत जात आहे. अशातच तिचा नवरा आणि भाऊ असे दोघे या पुलावरुन चालत येत आहेत. त्यावेळी गाडी चालवताना दोघांपैकी एकाला धक्का लागणार आहे, तर तुम्ही धक्का कोणाला माराल? असा तो प्रश्न होता. त्यावर काही महिलांनी भाऊ, तर काहींनी नवरा असं गंमतीशीर उत्तर दिलं. मात्र, शेवटी हे दोन्ही सोडून जर गाडीचा ब्रेक माराल तर काय होईल? असं उत्तर मिळताच सर्वांमध्ये हशा रंगला.
उत्स्फूर्त प्रतिसाद : ज्ञानात भर घालणाऱ्या या स्पर्धेत महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. वाहन चालवताना सांकेतिक चिन्हे काय दर्शवतात याचं ज्ञान काही महिलांना माहीत असल्याचं निदर्शनास आलं. ट्रॅफिक सिग्नल लागल्यावर त्याचं पालन कसं करावं, वाहन कुठं थांबवायचं, कुठं नाही याबाबत माहिती महिलांना ज्ञात असते. अनेक प्रकारच्या परीक्षा देऊन आपल्या ज्ञानाची तपासणी केली जाते, मात्र वाहतुकीच्या नियमाबाबत चाचणी होत नाही. त्यामुळं सुरक्षित वाहतूक करताना कोणत्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे तशी माहिती महिलांना अवगत करून देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. या खेळात वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत अनोखे वान मिळाल्याचं मत उपस्थितीत स्पर्धकांनी व्यक्त केलं.
हेही वाचा -