रावळपिंडी Pak vs Ban 2nd Test Live : बांगलादेश क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासनं पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. रावळपिंडी इथं खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लिटननं संघाच्या पहिल्या डावात जबरदस्त शतक झळकावलं, ज्याच्या जोरावर बांगलादेशनं अवघ्या 26 धावांत 6 गडी गमावून दमदार पुनरागमन केलं आणि सामन्यात स्वतःला कायम ठेवलं. लिटनचं कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक आहे, तर दुसऱ्यांदा त्यानं पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं आहे. यात लिटननं मेहदी हसन मिराजसोबत शतकी भागीदारीही केली. (pakistan national cricket team vs bangladesh national cricket team)
शतक झळकावून संघाला वाचवलं : कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडीवर असलेला बांगलादेशी संघ दुसऱ्या कसोटीत अडचणीत सापडला होता. पाकिस्तानप्रमाणेच पुन्हा एकदा त्यांची टॉप ऑर्डरही अपयशी ठरली आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी दिवसाच्या पहिल्या सत्रातच 6 विकेट घेतल्या. खुर्रम शहजादनं 4 आणि मीर हमजानं 2 बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. अशा स्थितीत सातव्या क्रमांकावर आलेल्या लिटन दासनं डावाची धुरा सांभाळली आणि शानदार शतक झळकावलं.
पाकिस्तानविरुद्ध दुसरं शतक : लिटननं दिवसाच्या तिसऱ्या सत्रात 171 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे लिटन शतकापासून 17 धावा दूर असताना बांगलादेशची आठवी विकेट पडली होती आणि दहाव्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्यासोबत क्रिझवर होता. शिवाय चहाचा ब्रेकही झाला होता. तिसऱ्या सत्रात आलेल्या लिटननं तरीही जबाबदारी सांभाळली आणि जास्त वेळ न घेता आपलं शतक पूर्ण केलं. अबरार अहमदच्या चेंडूवर चौकार मारुन त्यानं चौथं कसोटी शतक पूर्ण केलं, तर पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्यांदा शतक पूर्ण केलं.