वेलिंग्टन NZ vs SL 1st ODI Live Stream : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना 05 जानेवारी (रविवार) रोजी बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन इथं खेळवला जाईल. न्यूझीलंडनं यापुर्वी झालेली T20 मालिका 2-1 नं जिंकली आणि आता वनडे मालिकाही जिंकण्याची त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, श्रीलंकेनं न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा T20I जिंकला आणि वनडे मालिकेची सुरुवात विजयानं करण्याचा प्रयत्न असेल. तिसऱ्या T20 सामन्यात श्रीलंकेनं हाय स्कोअरिंग खेळात न्यूझीलंडचा 7 धावांनी पराभव केला.
तिसऱ्या T20 सामन्यात काय झालं :कुसल परेराच्या शानदार शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 218/5 धावा केल्या. कुसल परेरानं 46 चेंडूत 101 धावा केल्या तर कर्णधार चारिथ असलंकानं 24 चेंडूत 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं 20 षटकांत 7 बाद 211 धावा केल्या. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघ पहिल्या वनडेसाठी सज्ज झाले आहेत.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एकूण 105 सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडनं 52 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेनं 43 वेळा विजय मिळवला आहे. 9 सामने निकालाशिवाय संपले, तर 1 सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांमधील सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे, ज्यात कधी न्यूझीलंडनं वर्चस्व दाखवलं आहे तर कधी श्रीलंकेनं चमकदार कामगिरी केली आहे. वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच खास राहिला आहे.
2015 मध्ये जिंकला शेवटचा सामना :न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1979 मध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. यानंतर नेहमीच हे दोन्ही संघ एकमेकांच्या देशाचा दौरा करत आहेत. मात्र श्रीलंकेला न्यूझीलंडमध्ये वनडे सामना जिंकण्यासाठी संघर्ष कारावा वागत असल्याचं दिसत आहे. त्यांनी 31 डिसेंबर 2015 रोजी श्रीलंकेत शेवटचा सामना जिंकला होता. त्यामुळं आता 10 वर्षांनंतर वनडे सामना जिंकण्यासाठी लंकन संघ मैदानात उतरणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना कधी आणि कुठं होणार आहे?
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 05 जानेवारी (रविवार) रोजी बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन इथं भारतीय वेळेनुसार पहाटे 03:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक पहाटे 03:00 वाजता होईल.