माउंट माउंगानुई NZ Beat SL in 2nd T20I : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 45 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघानं मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
कीवींची आव्हानात्मक मजल : दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 13 धावांच्या स्कोअरवर त्यांना पहिला मोठा धक्का बसला. मात्र यानंतर सर्व फलंदाजांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीनं न्यूझीलंड संघानं 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमननं सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान मार्क चॅपमनने 29 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मार्क चॅपमनशिवाय टीम रॉबिन्सन आणि मिचेल हे यांनी 41-41 धावा केल्या. तर श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगानं सर्वाधिक दोन बळी घेतले. वानिंदू हसरंगाशिवाय नुवान तुषारा आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.