हॅमिल्टन NZ Beat SL by 113 Runs :न्यूझीलंड क्रिकेट संघानं दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला आहे. त्याचा या मालिकेतील हा सलग दुसरा विजय आहे. यासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पावसामुळं हा सामना केवळ 37 षटकांचाच खेळता आला. प्रथम फलंदाजी करताना कीवी संघानं 9 गडी गमावून 255 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 142 धावांवर गडगडला. न्यूझीलंडसाठी, रचिन रवींद्रनं या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 63 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
प्रत्येक विभागात चांगली कामगिरी : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एका संघाप्रमाणे कामगिरी केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, कीवी संघानं प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 31 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर रचिन रवींद्रनं मार्क चॅपमनसोबत 112 धावांची भागीदारी केली. रचिननं 79 आणि चॅपमननं 63 धावा केल्या. मात्र, यानंतर कीवी संघानं लागोपाठच्या अंतरानं 3 विकेट गमावल्या.
लंकेचे फलंदाज स्वतात बाद : मात्र नंतर डॅरिल मिशेलनं 38 धावा, ग्लेन फिलिप्सनं 22 धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरनं 20 धावा करत संघाला 255 धावांपर्यंत नेलं. फलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जेकब डफी, मॅच हेन्री आणि विल्यम ओ'रुर्के यांनी मिळून श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरची शिकार केली आणि त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. अवघ्या 22 धावांवर श्रीलंकेच्या संघानं 4 विकेट गमावल्या. तर 79 धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता.