वेलिंग्टन NZ Beat SL in 1st ODI :न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 05 जानेवारी (रविवार) रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह इथं खेळला गेला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेचा 9 गडी राखून दारुण पराभव केला. या विजयात न्यूझीलंडची उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह कीवी संघानं सुमारे वर्षभरानंतर वनडे सामन्यात विजय मिळवला आहे.
श्रीलंकेची फलंदाजी अपयशी :या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटरनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांन चांदली खेळी करता आली नाही आणि त्यांचा डाव 43.4 षटकांत 178 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोनं सर्वाधिक 56 धावा केल्या. त्यानं ही खेळी 63 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं खेळली. तसंच जेनिथ लियानागेनं 36 आणि वानिंदू हसरंगानं 35 धावांचं योगदान दिलं. तर न्यूझीलंडसाठी मॅट हेन्रीनं अप्रतिम गोलंदाजी करत 10 षटकांत 19 धावा देत 4 बळी घेतले. जेकब डफीनं 8.4 षटकांत 39 धावांत 2 बळी घेतले, तर नॅथन स्मिथनंही 8 षटकांत 43 धावांत 2 बळी घेतले.
न्यूझीलंडचा T20 स्टाईलनं विजय : या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघानं T20 स्टाईलनं फलंदाजी करत 26.2 षटकांत 180 धावा केल्या आणि सामना 9 गडी तसंच 142 चेंडू शिल्लक ठेवत जिंकला. सलामीवीर विल यंगनं 95 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. त्यानं 86 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीनं ही खेळी खेळली. रचिन रवींद्रनंही 36 चेंडूंत 8 चौकारांसह 45 धावा केल्या. मार्क चॅपमननं नाबाद 29 धावा करत संघाला विजयाकडे नेले. श्रीलंकेकडून चामिंडू विक्रमसिंघे यानं 3.2 षटकांत 28 धावा देत एकमेव विकेट घेतली. तर श्रीलंकेचे स्टार गोलंदाज वानिंदू हसरंगा आणि असिथा फर्नांडो यांना यश मिळालं नाही.
कीवींनी वर्षभरानंतर जिंकला वनडे सामना : या विजयासह न्यूझीलंड संघानं सुमारे वर्षभराहून अधिक काळानंतर वनडे सामना जिंकला आहे. यापुर्वी शेवटचा वनडे सामना त्यांनी बांगलादेशविरुद्ध 20 डिसेंबर 2023 रोजी जिंकला होता. यानंतर न्यूझीलंड संघानं श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत 3 वनडे सामने खेळले होते, मात्र यात त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता. आता घरच्या मैदानावर कीवी संघानं श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात विजय मिळवत पराभवाची परतफेड केली आहे. मालिकेतील दुसरा सामना 8 जानेवारी रोजी हॅमिल्टन इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 06:30 वाजता सुरु होणार आहे.
हेही वाचा :
- 18 वर्षांनंतर आफ्रिकेत पाहुणे सामना जिंकण्यासाठी मैदानात, भारताला फायदा की नुकसान? 'इथं' पाहा लाईव्ह मॅच
- सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया 'पिंक जर्सी'मध्ये मैदानात; कारण काय?