महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; 'हा' दिग्गज खेळाडू करणार संघाचं नेतृत्त्व - t 20 world cup - T 20 WORLD CUP

New Zealand Squad : न्यूझीलंडनं 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंड संघ 7 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

New Zealand Squad
टी-20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; 'हा' दिग्गज खेळाडू करणार संघाचं नेतृत्त्व

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 11:00 AM IST

हैदराबाद New Zealand Squad : न्यूझीलंडनं आज टी-20 विश्वचषक 2024 साठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. यासह 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिलाच देश ठरलाय. किवी संघानं या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी अनुभवी केन विल्यमसनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीसारख्या अनुभवी खेळाडूंनाही संघात स्थान मिळालंय.

पहिल्या विश्वविजयाची किवींना प्रतिक्षा : केन विल्यमसन सहाव्यांदा टी-20 विश्वचषकात खेळणार असून कर्णधार म्हणून तो चौथ्यांदा या स्पर्धेत खेळेल. तसंच टीम साैदी सातव्यांदा या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर बोल्टचा हा पाचवा टी-20 विश्वचषक असेल. न्यूझीलंड संघ हा टी-20 विश्वचषक जिंकून आपलं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

  • अनेकांची संधी हुकली : न्यूझीलंड संघात कोणतीही आश्चर्यकारक निवड झाली नाही. आघाडीचा वेगवान गोलंदाज काइले जेमिन्सन आणि अष्टपैलू ॲडम मिल्न दुखापतींमुळं संघाचा भाग नाहीत. तर विल्यम ओ'रुर्के, टॉम लॅथम, टिम सेफर्ट आणि विल यंग यांनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करुनही संघात स्थान मिळवता आला नाही.

रवींद्रवर व्यक्त केला विश्वास : किवींच्या संघात अनुभवी सलामीवीर कॉलिन मुनरोला पुनरागमन करता आलेलं नाही. त्याच्याऐवजी न्यूझीलंडनं युवा रचिन रवींद्रवर विश्वास दाखवलाय. याशिवाय वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचाही समावेश करण्यात आलाय. किवी संघानं युवा वेगवान गोलंदाज बेन सियर्सवरही विश्वास व्यक्त केला, परंतु त्याचा समावेश राखीव खेळाडू म्हणून करण्यात आलाय.

  • न्यूझीलंडचा पहिला सामना कधी : न्यूझीलंड संघ 7 जून रोजी गयाना इथं अफगाणिस्तान विरुद्ध टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. न्यूझीलंडचा संघ सह-यजमान वेस्ट इंडिज, युगांडा आणि पापुआ न्यू गिनीसह क गटात आहे.
  • टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोढी आणि टिम साउदी.

1 मे पर्यंत संघ जाहीर करायची डेडलाईन : 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला देश आहे. आयसीसीनं सर्व संघांसाठी संभाव्य 15 ची घोषणा करण्याची अंतिम तारीख 1 मेपर्यंत ठेवली आहे. येत्या काही दिवसांत अनेक देश त्यांच्या संघांची घोषणा करू शकतात. भारतीय संघाची घोषणा 1 मे रोजी होण्याची शक्यता आहे. किवी संघ 7 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याचवेळी भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा :

  1. बंगळुरूचा सलग दुसरा विजय; जॅक-कोहलीच्या दमदार फलंदाजीनं घरच्या मैदानावर गुजरातचा पराभव - GT vs RCB Live Score
  2. 'शाही' विजयासह राजस्थानचं प्लेऑफमध्ये स्थान निश्चित; घरच्या मैदानावर लखनऊच्या नवाबांचा दारुण पराभव - LSG vs RR

ABOUT THE AUTHOR

...view details