क्राइस्टचर्च First New Zealand Player to Score 9000 Test Runs : न्यूझीलंड आणि इंग्लंड क्रिकेट संघ पहिल्या कसोटी सामन्यात आमनेसामने आहेत. हा सामना क्राइस्टचर्चच्या हॅगली ओव्हलवर खेळला जात आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी फलंदाजी करत दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट गमावून 319 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंडची फलंदाजी उत्कृष्ट झाली.
विल्यमसननं रचला नवा इतिहास : हॅरी ब्रूकच्या 171 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लिश संघानं पलटवार करत 499 धावा केल्या. ब्रूकशिवाय ऑली पोपनं 77 आणि बेन स्टोक्सनं 80 धावांचं योगदान दिलं. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 23 धावांत संघानं दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी आघाडी घेत चहापानाच्या वेळेपर्यंत संघाची धावसंख्या 62/2 पर्यंत नेली. यादरम्यान न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसननं नवा इतिहास रचला.
केन विल्यमसननं गाठला ऐतिहासिक टप्पा : पहिल्या डावात 93 धावांची शानदार खेळी करणाऱ्या केन विल्यमसननं न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात आपली 26वी धावा पूर्ण करताच कसोटीत 9000 धावा पूर्ण केल्या. यासह विल्यमसन 9000 कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला. याआधी एकाही किवी फलंदाजाला हा आकडा स्पर्श करता आला नव्हता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 9 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा केन हा जगातील 19 वा फलंदाज ठरला आहे.