मुंबई Biggest Victory in SMAT T20 : सध्या भारतीय देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा खेळवली जात आहे. यात अनेक युवा खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत. दरम्यान, डावखुरा फिरकीपटू आबिद मुश्ताकनं आपल्या गोलंदाजीनं कहर केला. त्यानं अवघ्या 7 चेंडूत 4 विकेट घेत 3 षटकांत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. 'क' गटातील हा सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी स्टेडियमवर खेळला गेला.
सात चेंडूत घेतले 4 बळी : वास्तविक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना झाला होता. या T20 सामन्यात अरुणाचल प्रदेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अत्यंत खराब कामगिरी केली. त्यांचा संपूर्ण संघ केवळ 9.1 षटकंच खेळू शकला आणि 32 धावांवर त्यांचा डाव गडगडला. या काळात आबिद मुश्ताकनं केवळ 1.1 षटकं टाकली. या 7 चेंडूत आबिदनं फक्त 2 धावा देत अरुणाचल संघाच्या 4 खेळाडूंना बळी बनवले. आबिदशिवाय रसिक सलामनं 1 बळी, आकिब नबीनं 3 आणि जम्मूकडून युद्धवीर सिंगनं 2 बळी घेतले.
अरुणाचलच्या नावावर लज्जास्पद विक्रम : फलंदाजीत अरुणाचल संघाच्या एकाही फलंदाजाला 5 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. या पराभवानंतर अरुणाचलच्या नावावर अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2009 मध्ये त्रिपुरा संघ 30 धावांवर बाद झाला होता.