अबूधाबी (युएई) IRE vs SA 1st ODI Live Streaming : आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी झाला. यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आज 4 ऑक्टोंबर रोजी होत आहे. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा आयरिश संघाचा प्रयत्न असणार आहे.
पहिल्या सामन्यात काय झालं : आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली दोन सामन्यांची T20 मालिका 1-1 नं बरोबरीत सुटली. यानंतर बुधवार 2 ऑक्टोबरपासून यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आयर्लंडचा 139 धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी रायन रिकेल्टननं 102 चेंडूत 91 धावांची शानदार खेळी केली. ज्यासाठी रिकेल्टनला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं. तर ट्रिस्टन स्टब्सनं 86 चेंडूत 79 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत लिझाद विल्यम्सनं 10 षटकांत 28 धावा देत 1 मेडन आणि 4 बळी घेतले. त्याचवेळी आयर्लंडकडून एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेची घातक फलंदाजी :पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ गडगडला आणि संघाचे तीन फलंदाज अवघ्या 39 धावांत बाद झाले. यानंतर रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाला धावसंख्येला पुढं नेलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 271 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकेल्टननं 91 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान रायन रिकेल्टननं 102 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार ठोकले. रायन रिकेल्टनशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं 79 धावा केल्या. आयर्लंडकडून मार्क एडेअरनं सर्वाधिक विकेट घेतल्या. मार्क एडेअरशिवाय क्रेग यंगनं तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या.
आयर्लंडचा डाव गडगडला : यानंतर 272 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 31.5 षटकांत केवळ 132 धावा करु शकला नाही. आयर्लंडकडून जॉर्ज डॉकरेलनं सर्वाधिक 21 धावा केल्या. जॉर्ज डॉकरेल व्यतिरिक्त अँड्र्यू बालबर्नी आणि कर्टिस कॅम्फर यांनी 20-20 धावांची खेळी खेळली. लिझार्ड विल्यम्सनं दक्षिण आफ्रिकेसाठी घातक गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लिझार्ड विल्यम्सनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लिझार्ड विल्यम्सशिवाय लुंगी एनगिडी आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण नऊ वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सात सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडनं एक सामना जिंकला आहे. तर दोन्ही संघांदरम्यान एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
खेळपट्टी कशी असेल : अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळते. जसजसा सामना पुढं जाईल तसतसं खेळपट्टीचं स्वरुप बदलू शकते. त्यामुळं टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका पूर्ण वेळापत्रक :
- पहिला T20 - 27 सप्टेंबर, दक्षिण आफ्रिका 8 विकेटनं विजयी
- दुसरा T20 - 29 सप्टेंबर (आयर्लंड 10 धावांनी विजयी)
- पहिला वनडे - 2 ऑक्टोबर (दक्षिण आफ्रिका 139 धावांनी विजयी)
- दुसरा वनडे - आज (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- तिसरा वनडे - 7 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी खेळला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना शुक्रवार, 4 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.