रायपूर : छत्तीसगडच्या जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं नक्षलवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे. गरियाबंद जंगल परिसरात नक्षलवादी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. 19 जानेवारीच्या रात्रीपासून मैनपूर परिसरातील कुल्हाडी घाट-भालुडीघी टेकडीवर ही चकमक सुरू आहे. आज चकमकीचा चौथा दिवस आहे. छत्तीसगड पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार चकमक अद्यापही सुरू आहे. हा परिसर खूप दाट जंगलाचा असल्यानं शोध मोहिमेत बराच वेळ लागत आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी 14 नक्षलवाद्यांचा खातमा केला आहे.
छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती परिसरात चकमक : छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमावर्ती परिसरात ही चमकम सुरु असल्याची माहिती रायपूरचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी मंगळवारी सायंकाळी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "19 जानेवारीच्या रात्रीपासून कुल्हाडीघाट आणि भालुदिघी टेकडीवर ही चकमक सुरू झाली. नक्षलवादी विरोधात ई 30 गरियाबंद, कोब्रा 207, केंद्रीय राखीव पोलीस दल क्रमांक 65, 211 बटालियन आणि ओडिशातील एसओजी जिल्हा नुआपाडा यांच्या संयुक्त दलातील जवान या चकमकीत सहभागी झाले आहेत. आतापर्यंत चकमकीत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे."
14 नक्षलवाद्यांचे सापडले मृतदेह : छत्तीसगड आणि ओडिशा सीमावर्ती परिसरात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत तब्बल 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना आतापर्यंत 14 नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर आढळून आले आहेत. या नक्षलवाद्यांमध्ये 6 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांकडून 15 शस्त्रं सापडली आहेत. यामध्ये INSAS, SLR, 303, रिव्हॉल्व्हर, काडतुसं, BJL लाँचरचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांकडं मोठ्या प्रमाणात काडतुसांचा समवेश असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे.
चकमकीत कुख्यात नक्षलवादी ठार : या चकमकीत अनेक कुख्यात नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, या चकमकीत "एका कुख्यात नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. उर्वरित नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात आली. मारले गेलेले बहुतेक नक्षलवादी ओडिशा राज्य समिती, एसडी क्षेत्र समितीचे कार्यकर्ते होते. नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. ही चकमक अद्यापही सुरू आहे. त्यामुळे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे."
चकमकीत दोन जवान झाले गंभीर : छत्तीसगड आणि ओडिशाच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. "या चकमकीत दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. सोमवारी एक कोब्रा बटालियनचा जवान जखमी झाला तर मंगळवारी एक एसओजी जवान जखमी झाला. दोन्ही सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्यावर रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी दिली.
घटनास्थळावर नक्षलवाद्यांच्या डायऱ्या आणि फोटो : "नक्षलवाद्यांचं या चकमकीत मोठं नुकसान झालं. अनेक कुख्यात नक्षलवाद्यांचा या चकमकीत खात्मा करण्यात जवानांना यस आलं. शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळावर नक्षलवाद्यांचे कागदपत्रं आढळून आले. यात नक्षलवाद्यांना दुसऱ्या परिसरात विस्तार करण्याची चर्चा होती. पंचायत निवडणुकांना विरोध करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती. नक्षलवाद्यांसह अनेकांचे फोटो सापडले आहेत. एक डायरी देखील सापडली असून या डायरीमध्ये लिहिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस नक्षलवाद्यांच्या शहरी आणि ग्रामीण नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत," असं पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी सांगितलं. गरियाबंद सीमेच्या 10 किमी आत 25 ते 30 नक्षलवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुल्हाडीघाट-भालुडीघ टेकडी हे खूप दाट जंगल आहे. जंगलात सर्वत्र सुरुंग आणि आयईडी लावलेले आहेत. त्यामुळे सैनिकांना ऑपरेशन पार पाडण्यात खूप अडचणी आल्या. दिवसाही तिथली दृश्यमानता खूपच कमी आहे. पण जवानांनी मोठ्या शौर्यानं नक्षलवाद्यांना घेरलं. जंगलाच शोध अजूनही सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :