बेंगळुरु Triple Hundred in ODI : 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात द्विशतक करणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. आतापर्यंत व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे यश मिळवणारे खूप कमी क्रिकेटपटू आहेत. पण एका भारतीय खेळाडूनं 50 षटकांच्या सामन्यात त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला अंडर-10 वनडे ट्रॉफीमध्ये ही ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली. मुंबईची फलंदाज इरा जाधवनं ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे इरा जाधव सध्या फक्त 14 वर्षांची आहे.
इरा जाधवनं ठोकलं त्रिशतक : बेंगळुरुच्या अलूर स्टेडियमवर मुंबई संघाचा सामना मेघालयाशी झाला. इरा जाधवनं मेघालयविरुद्ध ही विक्रमी खेळी खेळली. या सामन्यात तिनं 157 चेंडूत 346 धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान, इरा जाधवनं 42 चौकार आणि 16 षटकारही मारले. तिनं 220 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. यादरम्यान त्यानं 138 चेंडूत आपलं त्रिशतक पूर्ण केलं. यासह, इरा जाधव अंडर 19 वनडे ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या खेळीसह, इरा जाधव अंडर 19 वनडे करंडकात भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाजही बनली.
इरा जाधवनं स्मृती मानधनाला टाकलं मागे : इरा जाधवच्या आधी अंडर 19 वनडे ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर होता. स्मृती मानधनानं 224 धावांची नाबाद खेळी केली. पण इरा जाधव तिच्यापेक्षा खूप पुढं गेली आहे. याशिवाय राघवी बिश्त, जेमिमा रॉड्रिग्ज आणि सानिका चालके यांनीही 19 वर्षांखालील वनडे सामन्यांमध्ये द्विशतकं झळकावली आहेत. 18 जानेवारीपासून होणाऱ्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकासाठी इरा जाधवची भारतीय संघात निवड झाली आहे, परंतु ती एक स्टँडबाय खेळाडू आहे.