नवी दिल्ली India Cricket Team Next Match : भारतीय क्रिकेट संघानं अलीकडेच श्रीलंकेचा दौरा केला होता. जिथं भारतीय संघ तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळला होता. भारतीय संघ टी 20 मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. मात्र, एकदिवसीय मालिकेत त्यांना 0-2 नं पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ आपली पुढची मालिका कोणासोबत आणि कधी खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला भारतीय संघाच्या पुढील वेळापत्रकाबद्दल सांगणार आहोत. संघ सध्या ब्रेकवर असला तरी त्यानंतरचं वेळापत्रक मात्र अतिशय व्यस्त असणार आहे.
भारतीय संघाची पुढची मालिका कधी : श्रीलंका दौरा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंना तब्बल 43 दिवसांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. आता 19 सप्टेंबरपासून भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतीय संघाची पुढील मालिका बांगलादेशविरुद्ध असेल, ती कसोटी मालिका असेल आणि ती भारतातच खेळली जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर भारत आणि बांगलादेशमध्ये 3 टी-20 सामनेही होणार आहेत. ही कसोटी मालिका 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर आणि टी 20 मालिका 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - चेन्नई (19 ते 23 सप्टेंबर)
- दुसरी कसोटी - कानपूर (27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर)
- पहिला टी 20 - धर्मशाला (6 ऑक्टोबर)
- दुसरा टी 20 - दिल्ली (9 ऑक्टोबर)
- तिसरा टी 20 - हैदराबाद (12 ऑक्टोबर)
न्यूझीलंड विरुद्ध मालिका : बांगलादेशनंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यात दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून शेवटचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेचं वेळापत्रक :
- पहिली कसोटी - बेंगळुरु (16 ते 20 ऑक्टोबर)
- दुसरी कसोटी - पुणे (24 ते 28 ऑक्टोबर)
- तिसरी कसोटी - मुंबई (1 ते 5 नोव्हेंबर)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार टी-20 मालिका : बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन संघांचं यजमानपद भूषवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. या दौऱ्यात त्यांना 4 टी-20 सामने खेळायचे आहेत. ही मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून शेवटचा सामना 15 नोव्हेंबरला होणार आहे.