राजकोट Highest Score in WODI :भारतीय महिला क्रिकेट संघानं आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इतिहास रचला. टीम इंडियानं वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा गाठला. भारताचा याआधीचा सर्वोच्च धावसंख्या 370 धावा होती, परंतु राजकोटच्या मैदानावर स्मृती मंनधाना आणि प्रतीका रावल यांनी केलेल्या शतकांच्या जोरावर टीम इंडियानं 400 धावांचा टप्पा गाठला. भारतानं फक्त 46 षटकांत 400 धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे कारण वनडे सामन्यात 400 धावांचा टप्पा ओलांडणारा हा पहिला आशियाई संघ बनला आहे.
महिला क्रिकेटमध्ये 400 चा टप्पा किती वेळा ओलांडला गेला : महिला क्रिकेटमध्ये एखाद्या संघानं 400 चा टप्पा गाठण्याची ही सहावी वेळ आहे. न्यूझीलंड संघानं चार वेळा वनडे सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियानं हा पराक्रम फक्त एकदाच केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडणारा टीम इंडिया हा पहिला आशियाई संघ आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे आयर्लंडविरुद्ध 400 चा आकडा चार वेळा गाठला गेला आहे. डेन्मार्कविरुद्ध एकदा आणि पाकिस्तानविरुद्ध एकदा 400 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आहे. टीम इंडियानं सलग दोन सामन्यांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे. न्यूझीलंडनं सलग तीन वेळा वनडे सामन्यांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
टीम इंडियानं 72 तासांत आपला विक्रम मोडला :12 जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियानं 370 धावा केल्या होत्या, जे त्यांचा वनडे सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु फक्त 72 तासांत टीम इंडियानं हा विक्रम मोडला. सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी टीम इंडियाला 400 च्या पुढं नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतीकानं 129 चेंडूत 154 धावांची खेळी केली. हे तिचं वनडे क्रिकेटमधील पहिलंच शतक आहे. तर कर्णधार स्मृती मंनधानानं फक्त 80 चेंडूत 135 धावा केल्या. या खेळाडूनं फक्त 70 चेंडूत शतक झळकावलं आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.