महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मुंबईत कीवी संघ क्लीन स्वीप करणार की रोहितसेना प्रतिष्ठा वाचवणार? शेवटचा कसोटी सामना 'इथं' पाहा लाईव्ह

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून मुंबऊत सुरु होणार आहे.

IND vs NZ 3rd Test Live Streaming
भारतीय संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 1, 2024, 7:30 AM IST

मुंबई IND vs NZ 3rd Test Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या कसोटीत कीवी संघानं भारताचा 113 धावांनी पराभव केला. यासह कीवी संघानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेऊन भारतीय संघाला तिसरी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडं, न्यूझीलंड संघाला तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत भारताचा 3-0 असा धुव्वा उडवायचा आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ कसोटीत एकूण 64 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात भारतानं 22 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडनं 15 सामने जिंकले आहेत. याशिवाय 27 सामने अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळताना भारतानं 17 कसोटी जिंकल्या आहेत. त्याचवेळी 4 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

खेळपट्टी कशी असेल : पुण्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारत मुंबईतील आणखी एक टर्निंग पीच निवडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, मुंबईची खेळपट्टी साधारणपणे उसळीसाठी ओळखली जाते. जिथं वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे उघड झालं आहे की मालिकेच्या अंतिम कसोटीसाठी स्पोर्टिंग ट्रॅक तयार केला जाईल. अशा परिस्थितीत स्पोर्टिंग ट्रॅक तयार केल्यास सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. जसजसा सामना पुढं जाईल तसतसे फिरकीपटू वर्चस्व गाजवताना दिसतील. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

भारतीय संघानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही : भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 22 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात भारतीय संघानं 12 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि कीवी संघानं 6 मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 4 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघानं एकही मालिका गमावलेली नाही. भारतानं न्यूझीलंडला 10 टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केलं आहे. तर 2 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला विजय आवश्यक : पुणे कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सध्या पुणे कसोटी गमावूनही भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, पण आता फायनलची शर्यत पूर्वीपेक्षा अधिक रंजक झाली आहे. भारतीय संघ अजूनही न्यूझीलंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय संघ उर्वरित 6 पैकी 4 सामने जिंकावे लागतील आणि एक सामना अनिर्णित ठेवावा लागेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ यशस्वी ठरला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवार, 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता खेळवला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज/आकाशदीप, हर्षित राणा.

न्यूझीलंड : टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, मॅट हेन्री, विल ओ'रुर्के, एजाज पटेल

हेही वाचा :

  1. पाकिस्तानकडून कसोटीत पराभव, वेस्ट इंडिजविरुद्ध नव्या कर्णधारासह इंग्लंड संघ मैदानात; पहिला वनडे 'इथं' दिसेल लाईव्ह
  2. रोहित, विराट, धोनी... दिवाळीला कोण होणार मालामाल? 'इथं' पाहा IPL रिटेंशन लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details