अहिल्यानगर Maharashtra Kesari : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 29 जानेवारीला सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये साडेआठशे मल्लांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी पटकवणाऱ्याला थार देण्यात येणार आहे तर उपविजेत्याला बलेरो आणि इतर विजेत्यांना 19 बुलेट, 19 स्प्लेडर, 18 अर्ध्या ग्रामची सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. आज होणाऱ्या मातीच्या कुस्तीत महेंद्र गायकवाड सोलापूर याच्याविरुद्ध संकेत यादव परभणी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे तर गादीच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ पुणे विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे हे चारही मल्ल महाराष्ट्र मध्ये नावाजलेले असून कोण बाजी मारणार याकडे कुस्तीप्रेमींचं लक्ष लागून आहे.
कशी झाली सेमीफायनल : अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर बक्षीसं दिली जात आहेत. तरुण मुलांना कुस्तीचा आकर्षण निर्माण व्हावं तसंच कुस्ती तळागाळापर्यंत रुजावी यासाठी आयोजन केल्याचं आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्राम जगताप सोशल फाउंडेशनच्यावतीनं अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत चार दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अनेक तूल्यबळ लढती पाहावयास मिळाल्या. माती विभागातील पहिली सेमीफायनल सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड विरुध्द सोलापूर जिल्ह्याचाच विशाल बनकर यांच्यात शेवटपर्यंत रंगली. महेंद्रनं सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत गुण मिळवले. विशालनं अनेकवेळा महेंद्रवर चाल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेंद्रनं अखेर 4-1 असा विशालचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरी सेमीफायनल परभणीचा साकेत यादव विरुध्द गोंदियाचा सुहास गोदे अशी रंगली. साकेतनं वर्चस्व राखत सुहासचा 4-2 असा पराभव केला. मातीतील अंतिम लढत साकेत यादव विरुध्द महेंद्र गायकवाड यांच्यात रंगणार आहे.
माती विभागातील अंतिम सामना :
महेंद्र गायकवाड (सोलापूर) विरुद्ध साकेत यादव (परभणी)
महेंद्र गायकवाड हा उप-महाराष्ट्र केसरी राहिला असून त्याची ताकद आणि आक्रमकता त्याला प्रबळ दावेदार आहे. तर, साकेत यादवनंही प्रभावी खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळं हा सामना प्रेक्षणीय ठरणार आहे.
गादी विभागातील अंतिम सामना :
पृथ्वीराज मोहोळ (पुणे) विरुद्ध शिवराज राक्षे (पुणे)
दोन्ही मल्ल पुणे जिल्ह्यातील असले तरी अंतिम लढत अत्यंत अटीतटीची होईल. पृथ्वीराज मोहोळनं 11-0 च्या मोठ्या गुणांनी विजय मिळवत स्पर्धेत आपली ताकद दाखवली आहे, तर शिवराज राक्षेनं फक्त एका मिनिटात सामना जिंकून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. परिणामी या अंतिम सामन्यांमध्ये कोण बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
हेही वाचा :