राजकोटIndia Vs England 3rd Test Day 2 Match : राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला तिसरा कसोटी सामना भारतानं चौथ्याच दिवशी जिंकलाय. विशेष म्हणजे या सामन्यात भारतानं इंग्रजांना चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघानं तब्बल 434 धावांच्या मोठ्या फरकानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचलाय. गेल्या 90 वर्षातील इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराभव आहे. यासह या सामन्यात भारतीय संघानं अनेक विक्रम रचले आहेत.
- कसोटी क्रिकेटचा इतिहासात भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय : राजकोट कसोटीत भारतीय संघानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केलाय. भारतीय संघानं आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात 577 कसोटी सामने खेळले. या 577 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघानं धावांच्या बाबतीत मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरलाय.
भारतासाठी सर्वात मोठा कसोटी विजय :
- 434 धावांनी विरुद्ध इंग्लंड राजकोट 2024
- 372 धावांनी विरुद्ध न्यूझीलंड मुंबई 2021
- 337 धावांनी विरुद्ध साऊथ आफ्रिका दिल्ली 2015
- 321 धावांनी विरुद्ध न्यूझीलंड इंदौर 2016
- 320 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली 2008
- 90 वर्षातील इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव : भारतीय संघानं राजकोटमध्ये केलेला इंग्लंडचा पराभव हा धावांच्या बाबतीत मागील 90 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 1934 साली इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध 562 धावांनी पराभूत झाले होते. त्यानंतरचा हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.