चेन्नई IND vs ENG 2nd T20I Live Streaming : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या T20I मालिकेची सुरुवात 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यानं झाली. तो सामना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकला आणि मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना आज 25 जानेवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल, ज्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज आहेत, ज्यात भारतीय संघाचं लक्ष्य हा सामना जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायचं असेल तर इंग्लंड हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सामन्यात काय झालं : कोलकाता इथं झालेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला. परंतु त्यांना निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर सर्वबाद व्हावं लागलं. इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलरनं 68 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं केवळ 12.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठलं. टीम इंडियाकडून स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मानं 79 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
7 वर्षांनी चेन्नईत T20 आंतरराष्ट्रीय सामना : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 7 वर्षांनी T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे, ज्यात आतापर्यंत इथं फक्त 2 T20आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत आणि शेवटचा सामना 2018 मध्ये खेळला गेला होता. इथं खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला.
पहिल्या डावातील सरासरी धावा 150 पेक्षा जास्त :जर आपण चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या पाहिली तर ती सुमारे 150 धावा आहे, तर दुसऱ्या डावात इथं दव पडण्याची भूमिका देखील दिसून येतं, ज्यामुळं लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होतो. त्याच वेळी, चेन्नईच्या खेळपट्टीवरही फिरकी गोलंदाजांची जादू दिसून येते, जी इंग्लंड संघासाठी चांगली बातमी नाही कारण पहिल्या T20 सामन्यात त्यांचे फलंदाज वरुण चक्रवर्तीच्या चेंडूंचा सामना करण्यासाठी संघर्ष करताना स्पष्टपणे दिसलं होतं.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि इंग्लंड यांनी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध 25 सामने खेळले आहेत. यात भारतानं 14 सामने जिंकून आघाडी कायम ठेवली आहे. तथापि, इंग्लंडनं फक्त 11 सामने जिंकले आहेत. तर कोणताही सामना निकालाशिवाय संपलेला नाही.
भारत विरुद्ध इंग्लंड T20I मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20I सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता (भारत 7 विकेटनं विजयी)
- दुसरा T20I सामना : आज, चेन्नई
- तिसरा T20I सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
- चोथा T20I सामना : 31 जानेवारी 2025, पुणे
- पाचवा T20I सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे)