कटक IND vs ENG 2nd ODI Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघात पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज 09 फेब्रुवारी रोजी कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यातील पहिल्या सामन्यात भारतानं 4 विकेटनं विजय मिळवला आहे. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यापुर्वी पाच सामन्यांची T20 मालिकाही भारतानं 4-1 नं जिंकली. ही वनडे मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तयारीचा एक भाग आहे. विशेष म्हणजे कटकच्या मैदानावर टीम इंडिया जवळजवळ 6 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे.
पहिल्या वनडेत भारताचा विजय : तत्पुर्वी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडला फक्त 248 धावांवर रोखलं. यानंतर, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या मदतीनं टीम इंडियानं 40 षटकांत विजय मिळवला. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करेल तर इंग्लंड या सामन्यात मुसंडी मारुन मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 108 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतानं 59 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडनं 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले. दोन्ही संघांमधील हा सामना नेहमीच रोमांचक राहिली आहे, ज्यात भारतानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कटकच्या मैदानावर दोन्ही संघांमध्ये शेवटचा वनडे सामना 2017 मध्ये खेळला गेला होता, जो टीम इंडियानं 15 धावांनी जिंकला होता.
कटकच्या मैदानावर टीम इंडियानं खेळले 19 सामने : जर आपण कटकच्या बाराबती स्टेडियमबद्दल बोललो तर आतापर्यंत इथं 21 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 19 सामने भारतीय संघानं खेळले आहेत. इथं खेळल्या गेलेल्या 21 वनडे सामन्यांपैकी 2 सामने रद्द झाले तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं 12 सामने जिंकले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त 7 सामने जिंकता आले. या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 पैकी 13 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 225 ते 230 धावा झाल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारी (रविवार) रोजी कटक येथील बाराबती क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता खेळला जाईल. याचा टॉस अर्धातास आधी होईल.