मुंबई India Tour of Sri Lanka :आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तिथं ते 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. झिम्बाब्वे नंतर, भारतीय संघाला या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. त्या दौऱ्यात त्यांना प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारताचा श्रीलंका दौरा यापूर्वी 26 जुलैपासून सुरु होणार होता, मात्र बीसीसीआयनं आता त्यात बदल केला आहे.
नवीन वेळापत्रक काय : सुधारित वेळापत्रकानुसार आता भारतीय संघ 27 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. आधी भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून पल्लेकेले इथं खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं खेळवले जातील. 50-50 षटकांचे हे एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवले जातील.
गंभीर युगाची होणार सुरुवात : गेल्या महिन्यात भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी 20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेनंतरच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) माजी सलामीवीर गौतम गंभीरची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता या दौऱ्यापासूनच गंभीर त्याच्या कोचिंगला सुरुवात करणार आहे.