कानपूर India Batting Records : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी सामन्यात केवळ 35 षटकं खेळ झाली. यानंतर दोन दिवस पाऊस खलनायक राहिला आणि सामना थांबवण्यात आला. चौथ्या दिवशी बांगलादेशच्या खेळाडूंना भारतीय गोलंदाजांसमोर कोणतंही यश मिळाले नाही आणि संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. यानंतर भारतीय फलंदाजांनी T20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेट खेळलं आणि वेगानं धावा केल्या.
भारतीय संघानं 8.22 च्या रनरेटनं केल्या धावा : भारतीय संघानं फलंदाजीला आल्यावर अवघ्या 34.4 षटकांत 285 धावा केल्या आणि डावात 8.22 च्या धावगतीनं धावा केल्या. यासह भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आहे. 2017 मध्ये, ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्ध कसोटी डावात 7.53 च्या धावगतीनं 32 षटकांत 241 धावा केल्या होत्या. सन 2022 मध्ये, इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध 35.5 षटकांत 7.36 च्या धावगतीनं 264 धावा केल्या होत्या. यात आम्ही रनरेटच्या संदर्भात त्या सामन्यांबद्दल बोलत आहोत, जेव्हा एखाद्या संघानं कसोटी डावात 200 पेक्षा जास्त धावा केल्या.
भारताची खतरनाक फलंदाजी : बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघानं अशी फलंदाजी केली, जी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीच झाली नव्हती. भारतानं या डावात सर्वात वेगवान 50 धावा, सर्वात वेगवान 100 धावा, सर्वात वेगवान 150 धावा, सर्वात वेगवान 200 धावा आणि सर्वात वेगवान 250 धावांचा विक्रम मोडला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगानं या धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड फक्त भारतीय संघाच्या नावावर झाला आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय संघानं अवघ्या 3 षटकांत 50 धावा केल्या. हा नवा विश्वविक्रम आहे. यानंतर भारतीय संघानं 10.1 षटकांत 100 धावा, 18.2 षटकांत 150 धावा, 24.2 षटकांत 200 धावा आणि 30.1 षटकांत 250 धावा पूर्ण केल्या.
सगळ्या फलंदाजांची आक्रमक फलंदाजी : पहिल्या डावात फलंदाजीला आल्यावर भारताच्या यशस्वी जयस्वालनं (51 चेंडूत 72 धावा) प्रथम कर्णधार रोहित शर्मासह (11 चेंडूत 23 धावा) अत्यंत आक्रमक सलामी दिली. यानंतर विराट कोहली (35 चेंडूत 47 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68 धावा) यांनी ही आक्रमकता कायम ठेवली. शुभमन गिलनं देखील 36 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. अखेरीस आकाशदीपनं 5 चेंडूत 12 धावा ठोकल्या. त्यानं सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले. अशाप्रकारे भारतीय संघानं अवघ्या 34.4 षटकांतच 285 धावा ठोकल्या.
बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीत भारताच्या धावा :
- कसोटीतील सर्वात जलद 50 धावा - 3 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 100 धावा - 10.1 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 150 धावा - 18.2 षटकं
- कसोटीत सर्वात जलद 200 धावा - 24.2 षटकं
- कसोटीतील सर्वात जलद 250 धावा - 30.1 षटकं