दुबई IND Beat PAK by 6 Wickets : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रिडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं दिलेल्या 242 धावांचं लक्ष्य भारतानं 43व्या षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीनं नाबाद (100) शतकी खेळी करत भारताला एकहाती विजय मिळवून दिला.
कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिलं शतक : विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिलंच शतक झळकावलं आहे. याआधी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं. त्यानं या सामन्यात 111 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 7 चौकारांचा समावेश होता. त्याच्या फलंदाजीसमोर पाकिस्तानी गोलंदाज टिकू शकले नाहीत. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. परिणामी भारताचा विजय सुकर झाला.
कोहली आणि अय्यर यांची चांगली फलंदाजी : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला जलद सुरुवात दिली. रोहितनं 15 चेंडूत 20 धावा केल्या. त्याच्याशिवाय शुभमन गिलनं 46 धावा केल्या. विराट कोहली भारतीय संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला आणि त्यानं नाबाद 100 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली ज्यानं 56 धावांचं शानदार अर्धशतक झळकावलं. या खेळाडूंमुळंच भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला. कोहली आणि अय्यर यांच्याविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज मोठे अपयशी ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी अतिशय काळजीपूर्वक फलंदाजी केली आणि धावा करण्यात कोणतीही घाई दाखवली नाही.
पाकिस्तानी फलंदाजांची खराब कामगिरी : पाकिस्तानी संघाची सुरुवात चांगली झाली. जेव्हा संघानं फक्त 10 षटकांत 52 धावा केल्या होत्या. पण पॉवरप्लेमध्येच बाबर आझम (23 धावा) आणि इमाम उल हक (10 धावा) पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील क्रीजवर उतरले. या दोन्ही खेळाडूंनी खूप हळू फलंदाजी केली. रिझवाननं 77 चेंडूत फक्त 46 धावा केल्या, ज्यात त्याला फक्त तीन चौकार मारता आले. नंतर, शकीलनं जलद खेळण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यानं 76 चेंडूत 62 धावा केल्या. खुसदिल शाहनं 38 धावा केल्या. पाकिस्तानी संघ पूर्ण 50 षटकंही खेळू शकला नाही आणि 49.4 षटकांत फक्त 241 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा :
- अबब... 70000000 रुपयांचं घड्याळ घालून हार्दिक पांड्या PAK vs IND सामन्यात उतरला मैदानात
- विराट कोहली @14000... PAK vs IND सामन्यात दिग्गजांना मागे सोडत बनला जगातील अव्वल फलंदाज