मुंबई Ajaz Patel Record at Wankhede : मुंबईत सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय क्रिकेट संघ अवघ्या 263 धावांवर गारद झाला. यात न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल याचं महत्त्वाचं योगदान होतं. भारताच्या पहिल्या डावात त्यानं 5 बळी घेतले. त्याच्यामुळं भारतीय संघाला केवळ 28 धावांची आघाडी घेता आली.
5 भारतीय फलंदाजांना केलं आउट : भारतीय संघानं दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात केली होती आणि पहिल्या सत्रानंतर 5 विकेट गमावून 195 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारतीय संघ मोठी आघाडी घेताना दिसत होता. मात्र दुसऱ्या सत्रात एजाज पटेलनं रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर शुभमन गिल, सर्फराज खान आणि अश्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पहिल्या दिवशीही त्यानं यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना बाद केलं होतं.
मुंबई आहे खास, 3 वर्षांपूर्वीही त्यानं रचला होता इतिहास : एजाज पटेलसाठी मुंबईचं मैदान खूप खास आहे. यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे हे शहर त्याचं जन्मस्थान आहे. त्यांचा जन्म 1988 मध्ये इथं झाला. पण वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी तो मुंबई सोडून 1996 मध्ये कुटुंबासह न्यूझीलंडला गेला. न्यूझीलंडला गेल्यानंतर एजाजनं नागरिकत्व मिळवलं आणि त्यांच्यासाठीच क्रिकेट खेळू लागला. न्यूझीलंडकडून खेळणारा तो भारतीय वंशाचा पाचवा क्रिकेटपटू आहे. मुंबईचं वानखेडे स्टेडियम एजाजसाठी खास असण्याचं दुसरं कारण म्हणजे त्याची कामगिरी. याच मैदानावर त्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 2021 साली त्यानं एकाच डावात सर्व भारतीय फलंदाजांना बाद केलं होतं. एकट्या एजाजनं सर्व 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या. आता त्यानं पुन्हा एकदा 5 बळी घेत भारतीय संघाला त्या जुन्या 'जखमे'ची आठवण करुन दिली.