अमरावती : थरार अनुभवायची हौस असणाऱ्या पर्यटकांसाठी चिखलदरा येथील 'भीमकुंड' येथे खास 'जायंट स्विंग' तयार करण्यात आली आहे. साहसी पर्यटनाचं नवं थरारक दालन या निमित्तानं भीमकुंड येथे खुलं झालंय. तसंच यामुळं या परिसरातील आदिवासी युवकांना रोजगारही उपलब्ध झालाय.
असा आहे भीमकुंड अॅडव्हेंचर पार्क : मेळघाटात चिखलदरा लगत तीन-चार वर्षांपूर्वी आमझरी हा अॅडव्हेंचर पार्क सुरू झाला. आमझरीला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळायला लागली असताना भीम कुंड या अतिसंरक्षित क्षेत्र परिसरात मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत विशेष अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आला. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी 16 ऑगस्ट रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या ठिकाणी 18 मीटरची जायंट स्विंग आहे. 520 मीटरची झीप लाइन आणि 340 मीटरची स्काय सायकलिंग आहे. हे तिन्ही साहसी प्रकार खोल दरीच्या वरुन आहेत. या दरीच्या वर 340 मीटर सायकलिंग हा अनुभव देखील जायंट स्विंग इतकाच थरारक आहे. आमझरीच्या तुलनेत भीम कुंड येथील झीप लाइन ही दुप्पट अंतराची आहे. हे सारं काही भीतीदायक वाटत असलं तरी सुरक्षित असल्याचा दावा भीमकुंड अॅडव्हेंचर पार्कचे व्यवस्थापक मनीष ढाकुलकर यांनी केला. धाडसी पर्यटक या साहसी खेळांचा आनंद घेत आहेत, असे त्यांनी सांगितलं.
पर्यटकांची वाढली गर्दी : खरंतर गेल्या काही वर्षांपासून चिखलदरा येथील जवळपास सर्वच पर्यटन केंद्रावर पर्यटकांची गर्दी व्हायची. लगतच्या आमझरी परिसरातदेखील पर्यटकांची संख्या वाढली. असं असताना भीम कुंडावर केवळ पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठी गर्दी दिसायची, इतरवेळी मात्र शुकशुकाट राहायचा. पण आता भीमकुंड येथे थरारक साहसी क्रीडा प्रकाराला सुरुवात होताच पर्यटकांची गर्दी वाढली आहे. "जायंट स्विंगमध्ये प्रचंड भीती वाटली. मात्र, हा आनंद काही औरच होता", अशी प्रतिक्रिया रुद्रप्रताप पाटील या पर्यटकांनं दिली.
स्थानिकांना मिळतोय रोजगार : भीमकुंड येथे अॅडव्हेंचर पार्क सुरू झाल्यामुळं चिखलदरा, आलाडोह, मेमना या गावातील एकूण 16 तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळालाय. या ठिकाणी व्यवस्थापक असणारे मनीष ढाकुलकर यांनी उत्तराखंड येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिंग येथून साहसी क्रीडा प्रकारासंदर्भात प्रशिक्षण घेतलंय. या ठिकाणी लगतच्या गावातील आदिवासी युवकांना मनीष ढाकूरकर हे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत नेमकी कशी काळजी घ्यायची यासंदर्भात प्रशिक्षण देखील देत आहेत. तसंच स्थानिक तरुणांना किमान दहा हजार रुपये महिना या ठिकाणी मिळणार आहे. या भागातील तरुणांना रोजगारासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही, असं मनीष ढाकुलकर यांनी सांगितलं.
असे आहे वैशिष्ट्य : विदर्भातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चिखलदरापासून दीड किलोमीटर अंतरावर 'भीमकुंड' हा पॉईंट आहे. भीमकुंड या मुख्य पॉईंटपासून काही अंतरावर असणार नैसर्गिक जलस्त्रोत भीमकुंड या नावानं ओळखल्या जातो. महाभारत काळापासून या स्थानाला महत्त्व असल्याचं सांगितलं जातं. भीमकुंडातील पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक आहे. ज्या ठिकाणी धबधब्याच्या स्वरूपात पाणी कोसळतं त्या ठिकाणी एका कपारीमध्ये शिवलिंग आहे. या ठिकाणी जाणं अतिशय धोकादायक असून गत काही वर्षांपासून वनविभागानं भीमकुंडाकडं जाणारा मार्ग बंद केलाय. आता देखील ज्या ठिकाणी अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आलाय. त्या भागात देखील जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
भीमकुंडबाबत अशी आहे आख्यायिका : महाभारतात पांडव हे अज्ञातवासात असताना सातपुडा पर्वत रांगेत वास्तव्याला आले. त्यावेळी तहान लागल्यानं द्रौपदी बेशुद्ध झाली असता भीमानं ज्या ठिकाणी गदा मारला त्या ठिकाणावरून पाणी बाहेर आलं. यामुळं या स्थानाला भीमकुंड असं म्हटल्या जात असल्याचं सांगण्यात येतं. यासोबतच दुसऱ्या कथेनुसार पांडव हे विराट राजाकडं अज्ञातवासात असताना कीचक नावाच्या दैत्यानं द्रौपदीची छेड काढली असता भीमानं त्याचा वध केला. कीचकाच्या रक्तानं माखलेले हात भीमानं कुंडात धोतले, ते कुंड म्हणजे भीमकुंड असंदेखील सांगितलं जातं.
हेही वाचा -
- चिखलदरातील 'भीमकुंड' लाल माकडांपासून झालं मुक्त; 37 माकडांना पकडून सोडलं घनदाट जंगलात - Amravati Monkey News
- सातपुड्यात 'पांडव कचेरी'; घनदाट जंगलात पुरातत्व खात्यानं जपलाय ऐतिहासिक वारसा - Pandava Kacheri
- अमरावतीत आढळली दुर्मीळ पांढरी खारुताई : गाईच्या गोठ्यात मुक्काम इतर सवंगड्यांसोबत झाडांवर मारते उड्या - White Squirrel Spotted In Amravati