राजकोट IND vs ENG :भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावलं. जैस्वालने निरंजन शाह स्टेडियमच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांना पराभूत केलं आणि 122 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 100 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी त्याने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही द्विशतक झळकावलं.
बेन डकेटने यशस्वीच केल कौतूक : राजकोट कसोटीत शतक झळकावणारा इंग्लंडचा उजवा हात सलामीवीर बेन डकेटने तिसऱ्या दिवशी शतक झळकावणाऱ्या भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे कौतुक केलं आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला 'उगवता तारा' म्हणून संबोधलं आणि त्याच्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यासाठी खेळाडूंना त्याने प्रेरित केल आहे असही ते म्हणाले. कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडच्या प्रसिद्ध 'बेसबॉल' शैलीत फलंदाजी करणाऱ्या जयस्वालने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताच्या दुसऱ्या डावात शतक झळकावलं. पाठीच्या दुखण्यामुळे निवृत्त होण्यापूर्वी त्याने 133 चेंडूंत 104 धावांच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले.
भारताला श्रेय द्यायला हवं : इंग्लंडच्या पहिल्या डावात 151 चेंडूत 23 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 153 धावा करणाऱ्या डकेटने सांगितले की, शनिवारी भारतीय संघ अधिक चांगल्या योजना घेऊन मैदानात उतरला होता. तो म्हणाला, 'हा तो दिवस होता जेव्हा मला वाटतं की तुम्हाला भारताला श्रेय द्यायला हवं. सकाळच्या सत्रात तो सहजासहजी धावा काढण्याची संधी देत नव्हता.
200 धावांच्या दिशेने : यशस्वीचं हे शतक इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात झळकलं. या डावात त्याने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. पण नंतर त्याने वेगवान शैलीत खेळण्यास सुरुवात केली. झटपट फटके मारत त्याने षटकार आणि चौकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्यानं 81.52 च्या वेगवान स्ट्राइक रेटनं फलंदाजी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात जैस्वालची बॅट चालली नाही. तो 10 धावा करून बाद झाला. आता या डावात त्याने शतक ठोकलं आहे. त्याच्या शतकामुळे भारत दुसऱ्या डावात 200 धावांच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.