हैदराबाद IND Vs ENG Test :भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची चमक पाहायला मिळाली. भारताकडून केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. याशिवाय अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि केएस भरत यांनीही शानदार फलंदाजी करत झटपट धावा गोळा केल्या.
भारताकडे 175 धावांची आघाडी : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियानं 110 षटकांत 7 गडी गमावून 421 धावा केल्या आहेत. सध्या भारताकडे 175 धावांची आघाडी आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संघ 246 धावांवर गारद झाला होता. तर भारतानं पहिल्या दिवशी 1 गडी गमावून 119 धावा केल्या होत्या.
केएल राहुलच्या सर्वाधिक धावा : पहिल्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावा जोडल्या. रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 23 धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय श्रेयस अय्यरनं 3 चौकार आणि 1 षटकारासह झटपट 35 धावा केल्या. तर केएस भरतनंही 3 चौकारांच्या मदतीने 41 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारताकडून केएल राहुलनं सर्वाधिक धावा केल्या.