मुंबई - सैफ अली खानवर झालेल्या जोरदार चाकू हल्ल्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. काल रात्री एका चोरानं सैफ अली खानच्या घरात घुसून चोरी केली. त्याला पकडताच त्यानं सैफ आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि पळून गेला. या झटापटीत सैफ अली खानच्या शरीरावर सहा ठिकाणी खोल जखमा आहेत. सैफ अली खान मुंबईतील लीलावती रुग्णालयात भरती आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो धोक्यातून बाहेर पडला आहे.
दरम्यान या घटनेचा तपास करणाऱ्या मुंबई झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी तापासाची दिशा कशी सुरू आहे याचा खुलासा केला. हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 10 पथकं तयार करण्यात आली असून वेगवेगळ्या दिशेनं हा तपास होणार असल्याचं डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितलं.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची चौकशी करणाऱ्या टीमचा भाग असलेले मुंबई पोलीस डीसीपी झोन ९ चे अधिकारी दीक्षित गेडाम म्हणाले की, "एका आरोपीची ओळख पटली आहे. असं आढळून आलय की आरोपीन सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी 'फायर एस्केप'चा मार्ग वापरला. आतापर्यंतच्या तपासात असं दिसून आलं आहे की हा चोरीचा प्रयत्न होता. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्याला अटक झाल्यानंतर, आम्ही अधिक तपशील उघड करू शकू," असे ते म्हणाले.
एका आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालंय. मुंबईतील प्रभादेवी परिसरातून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सैफ अलीवरील हल्ला आणि चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलीस कोणतीही कसूर मागे ठेवत नसल्याचं दिसत आहे.
सैफ अली खानची मुलं इब्राहिम अली खान आणि सारा अली खान यांनी त्याची रुग्णालयात जाऊन भेट दिली. दरम्यान, ही बातमी शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला कळताच तो त्याच्या पत्नीसह मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचला होता.
सैफवर हल्ला केल्याची बातमी ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र लीलावती रुग्णालयात जमले आहेत. त्यापूर्वी सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान रुग्णालयाबाहेर दिसली. सैफची बहीण सोहा अली खान आणि मेहुणा कुणाल खेम्मू देखील सैफची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.