मुंबई - सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था शिल्लक नसल्याची टीका अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप केलाय. अलीकडच्या काही वर्षात राज्यात घटलेल्या घटना चिंताजनक असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
The intrusion and knife attack on Saif Ali Khan is shocking.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 16, 2025
We are relieved to hear that he is stable and recovering, and we pray that tough times are over, and he bounces back to normalcy at the earliest.
The fact that it happened, however, only highlights the absolute…
आदित्य ठाकरे यांनी सैफ अली खान बरा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "सैफ अली खानवर झालेला चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि बरा होत आहे हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला आहे. हा कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. असं असलं तरी, हे घडलं ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडवून देणारी आहे. गेल्या ३ वर्षांत हिट अँड रन प्रकरणं, अभिनेते आणि राजकारण्यांना धमक्या देणं आणि बीड आणि परभणीमधील घटनांसारख्या घटनांवरून हेच दिसून येतं की सरकार गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. आपल्या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणी आहे का?"
अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चोरानं हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात मुंबईतच नव्हे तर पुणे आणि बीड जिल्ह्यातही हल्ले होताना दिसत आहेत. गृहमंत्र्यांचं हे अपयश आहे. गृहमंत्र्यांनी जरा यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनीदेखील याकडे लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम केलं पाहिजे", असं यावेळी बजरंग
सोनवणे म्हणाले.
" it won't be right to say mumbai is unsafe based on one, two incidents": maharashtra cm devendra fadnavis
— ANI Digital (@ani_digital) January 16, 2025
read @ANI Story | https://t.co/6hovSlZn8e#CMFadnavis #Mumbai #DevendraFadnavis pic.twitter.com/eZgv8nsoNk
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सैफवर झालेला चाकू हल्ला गंभीर बाब असली तरी मुंबई असुरक्षित झालीय म्हणणं चुकीचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. "मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित महानगर आहे. ही घटना गंभीर आहे परंतु शहराला असुरक्षित म्हणून घोषित करणं चुकीचं आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.