छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वराचं दर्शन करुन शिर्डीला परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांवर काळानं घाला घातला. या भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 11 भाविक जखमी झाले आहेत. ही घटना गंगापूर वैजापूर महामार्गावरील तांबोळगोटा फाटा इथं बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी ( 48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने), अक्षिता श्यामशेट्टी (20) अशी अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावं आहेत.
भाविक घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन परत जात होते शिर्डीला : हैदराबाद इथले 14 भाविक शिर्डी इथं दर्शनासाठी आले होते. यावेळी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीप क्रमांक एसएच 17, बीडी 1897 नं वेरुळ लेणी पाहून घृष्णेश्वराचं दर्शनाला गेले. घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गंगापूर मार्गे शिर्डीला परतीचा रस्ता धरला. मात्र बुधारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास महालगावकडं उस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला या भाविकांच्या कारनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला, तर 11 भाविक जखमी झाले.
चार भाविक ठार, 11 जण जखमी : या अपघातात प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी ( 48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने), अक्षिता श्यामशेट्टी (20) या चार जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत. यात शिर्डी इथला कारचालक रामा वसंत कापुरे, रामबाबू बज्जुरी (43), प्रणाली (12), शेवंती (37), दीपक (7), व्यंकय्या (38), शरण्या श्रीनिवास (17) रमादेवी (55), कृष्णमूर्ती (65), यामिनी (35) आदींचा समावेश आहे. या अपघातातील जखमी ठार झालेले सगळे भाविक हैदराबाद इथले राहणारे आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बंदोबस्तावरुन परतलेल्या पोलिसांनी हलवलं रुग्णालयात : गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी रिजवान शेख, प्रविण प्रधान हे पोलिसांची गाडी घेऊन बंदोबस्तावरुन गंगापूरकडं येत होते. अपघात झाल्यानंतर काही क्षणात तत्काळ गंगापूर पोलिसांनी जखमींना पोलीस जीपमध्ये टाकून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं. जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मृतांच्या अंगावरील 4 तोळे सोनं पळवलं : जीप आणि ट्रॅक्टरच्या झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणि मृतांच्या अंगावरील चार तोळे सोने आणि 13 हजार रुपये रोख रक्कम पळवल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृताच्या अंगावरील सोने चोरुन नेल्याच्या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हे सोनं कोणी पळवलं याचा शोध पोलीस घेत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :