चेन्नई IND vs BAN 1st Test Day 2 : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात बांगलादेश पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शाकिब अल हसननं सर्वाधिक 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराहशिवाय आकाश दीप, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. पहिल्या डावात भारताला 227 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
आकाश दीपची धारदार गोलंदाजी : पहिल्या डावात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या 5 विकेट 40 धावांत पडले. बांगलादेशला डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहनं झटका दिला. शदमान इस्लाम (12) बुमराहच्या चेंडूला सोडण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू आतल्या बाजूनं आला आणि तो क्लीन बोल्ड झाला. यानंतर आकाश दीपची जादू सुरु झाली. त्यानं बांगलादेशी डावाच्या नवव्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर झाकीर हसन (3) आणि मोमिनुल हक (2) यांना क्लीन बोल्ड केलं. एकेकाळी तो हॅट्ट्रिक घेण्याच्या स्थितीत होता, पण मुशफिकुर रहीमनं ती होऊ दिली नाही.