चेन्नई IND vs BAN Chennai Test : सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरुद्ध चेपॉक इथं कसोटी सामना खेळत आहे. ज्यात अनेक रेकॉर्ड बनताना दिसत आहेत. पण या सगळ्यात आम्ही तुम्हाला एका अशा रेकॉर्डची जाणीव करुन देणार आहोत, ज्यावर चाहत्यांनाही विश्वास बसायला वेळ लागेल. चेपॉकच्याच मैदानावरच 36 वर्षांपूर्वी हा विक्रम झाला होता, जो आजही कायम आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला आपलं पदार्पण स्वप्नासारखं व्हावं असं वाटतं. फलंदाजाचं स्वप्न असतं की पहिल्याच सामन्यात शतक झळकावायचं आणि प्रत्येक फलंदाजाला आपलं कसोटी पदार्पण संस्मरणीय बनवायचं असतं. त्याचप्रमाणे गोलंदाजांनाही पहिल्या सामन्यात काहीतरी अप्रतिम करायचं असतं, जे जगाच्या लक्षात राहील. पण असं यश प्रत्येकाला मिळत नाही. काहींना यशाची चव चाखता येते तर काहींना किरकोळ यश मिळतं.
36 वर्षांपासून विक्रम अबाधित : फलंदाज असो वा गोलंदाज, कसोटीत दोन डाव असतात. पण मोजकेच खेळाडू दोन्ही डावांत चमत्कार करु शकतात आणि हीच कामगिरी आयुष्यभर त्यांची ओळख बनून जाते. असाच एक खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग म्हणजे नरेंद्र हिरवाणी. भारतातील क्रिकेटचं ज्ञान असणाऱ्या प्रत्येकाला नरेंद्र हिरवाणी हे नाव परिचित असेल. हिरवाणी हे त्या गोलंदाजाचं नाव आहे, ज्यानं आपल्या कसोटी पदार्पणातच आपल्या घातक गोलंदाजीनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सळो की पळो केलं आणि यादरम्यान त्यानं एक विश्वविक्रम रचला जो 36 वर्षांपासून मोडणं अशक्य आहे.
नरेंद्र हिरवाणी (Getty Images) पदार्पणाच्या कसोटीत अप्रतिम गोलंदाजीनं केलं आश्चर्यचकित : अवघ्या 16 वर्षात मध्य प्रदेशच्या रणजी संघात त्यानं आपलं स्थान निर्माण केलं. यानंतर 1988 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत पदार्पणाच्या संधीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या चांगल्या कामगिरीचं बक्षीस त्याला मिळालं. चेन्नई इथं झालेल्या चौथ्या कसोटीसाठी वयाच्या 19 व्या वर्षी हिरवाणीला संघात स्थान मिळालं. पण या युवा गोलंदाजानं आपल्या फिरकीनं विंडीजची फलंदाजी उद्ध्वस्त केली होती.
भारताचा दणदणीत विजय : हिरवाणीनं पहिल्या डावात 18.3 षटकांत अवघ्या 61 धावांत 8 बळी घेत आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. यानंतर त्यानं दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पराभूत केलं. हिरवाणीनं पुन्हा दुसऱ्या डावात 15.2 षटकांत 75 धावांत 8 बळी घेतले आणि वेस्ट इंडिजचा डाव 160 धावांत गुंडाळला आणि भारताला 255 धावांनी विजय मिळवून दिला.
भारतीय संघासाठी खेळले फक्त 17 कसोटी सामने : हिरवानीच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली आणि त्यानं केवळ 4 कसोटीत 36 विकेट घेतल्या. मात्र, यानंतर तो परदेशात या कामगिरीची पुनरावृत्ती करु शकला नाही आणि अवघ्या 17 कसोटींनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. हिरवानीनं या 17 कसोटींमध्ये 66 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. हिरवाणीनं एकूण 167 प्रथम श्रेणी सामन्यात 732 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :
- 'कमबॅक' असावा तर असा... 637 दिवसांनी खेळली कसोटी, T20 शैलीत झळकावलं शतक, धोनीच्या विक्रमाची बरोबरी - Rishabh Pant Test century