मुंबई Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत निवडणूक घेण्यात आली नव्हती. २०२३ च्या ऑगस्टमध्ये ही निवडणूक घेण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
सिनेटची निवडणूक अचानक केली स्थगित : सिनेटच्या १० जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. २२ सप्टेंबर रोजी रविवारी ही निवडणूक घेण्याचं सर्व नियोजन करण्यात आलं. मतदान केंद्रे, ओळखपत्रे, मतदारांना मेसेज पाठवण्यात आले होते. त्यानंतर अचानकपणे मुंबई विद्यापीठानं सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचं परिपत्रक काढलं होतं. त्यामुळं शिवसेना उबाठाच्या युवा सेनेतर्फे त्याचा निषेध करण्यात आला. युवा सेनेतर्फे या विरोधात तातडीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि या निर्णयाला आव्हान देण्यात आलं.
मुंबई विद्यापीठाला मोठा धक्का : सिनेट निवडणुकीची सर्व तयारी झालेली असताना शेवटच्याक्षणी निवडणूक रद्द करण्याचं कारण काय? असा प्रश्न याचिकेत दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाला रद्द करत, न्यायालयाने ठरल्याप्रमाणे २२ सप्टेंबर रोजीच सिनेट निवडणूक घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळं मुंबई विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे.
२२ सप्टेंबरला होणार सिनेट निवडणूक : न्यायमूर्ती चांदूरकर यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. या निर्णयामुळं शिवसेना उबाठा पक्षाला आणि युवा सेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी युवासेनेतर्फे अॅड. सरकारतर्फे राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं मुंबई विद्यापीठाची २२ सप्टेंबर रोजी नियोजित असलेली सिनेट निवडणूक स्थगित न करता त्याच दिवशी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळं यापूर्वी दोनवेळा रद्द झालेली निवडणूक अखेर रविवारी घेण्यात येईल, हे स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा -