मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगीबरोबरच घरगुती हिंसाचारासंदर्भात तक्रार दाखल केली होती. यावर आज (गुरुवार) वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं करुणा शर्मांना पोटगीसाठी 2 लाख रुपये धनंजय मुंडेंनी द्यावेत, असे निर्देश दिलेत. मात्र या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात अपील करणार आहोत. तसेच करुणा शर्मा ही धनंजय मुंडेंची पत्नी नाही. आमची भूमिका आम्ही कोर्टात मांडणार आहोत, असं धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग यांनी म्हटलंय.
लग्न नव्हे, तर लिव्ह इनमध्ये राहायचे : 2022 साली करुणा शर्मा यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. जर एखादा पुरुष आणि स्त्री एकत्र राहत असतील तर ती स्त्री कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत त्या पुरुषाकडून आपणाला उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत मागू शकते, तसेच अशा प्रकारची तक्रारही दाखल करू शकते. म्हणून सुरुवातीला 2022 साली करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तेव्हा त्यांनी आपणाला 5 ते 25 लाखांपर्यंत पोटगी मिळावी, असं त्या तक्रारीत म्हटलं होतं. यावर आज कोर्टाने निर्णय देताना करुणा शर्मांना उदरनिर्वाहासाठी धनंजय मुंडेंनी सव्वा लाख रुपये द्यावे, असं म्हटलंय. पण ऑर्डरमध्ये कुठेही शर्माही धनंजय मुंडेंची लग्नाची पत्नी आहे, असं म्हटलेलं नाही. त्यामुळं करुणा शर्मा ही धनंजय मुंडेंची पत्नी नाही, मात्र ते दोघे भूतकाळात लिव्ह एन रिलेशनशिप होते हे धनंजय मुंडेंनीदेखील मान्य केलंय, अशी माहिती धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंग यांनी दिलीय.
मारहाण, कौटुंबिक हिंसाचार नाही : करुणा शर्मांनी आपणाला मारहाण झाली आणि कौटुंबिक हिंसाचारामुळं मी कोर्टात गेले, असं म्हटलंय ते अत्यंत चुकीचं आहे. 25 पानांची कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात कुठेही कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख कोर्टाने केलेला नाही. विशेष म्हणजे बायको किंवा करुणा शर्माला पोटगी द्या, असं कोर्टाने कुठंही म्हटलेले नाही. तर करुणा शर्माच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्या, असं कोर्टानं म्हटलंय. तसेच करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे हे भूतकाळात लिव्ह एन रिलेशनशिप राहत होते. त्यांचे लग्न झाले नव्हते. करुणा शर्माने 1998 मध्ये धनंजय मुंडेंसोबत आपले लग्न झाले होते, असा दावा केला आहे, पण तो चुकीचा असल्याचं धनंजय मुंडेंचं वकील शार्दुल सिंग यांनी सांगितलंय.
माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी... : करुणा शर्मा आणि धनंजय मुंडेंच्या वादात आता त्यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे याने उडी घेतलीय. शिशिव धनंजय मुंडेंने सोशल मीडियावर पोस्ट करत माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवला असल्याचं म्हटलंय. माझे वडील जगातील सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांना वाईट वाटेल, असं कधीही वागले नाहीत. माझी आई अनेक कारणांमुळे त्रस्त असायची त्यामुळं ती आमच्यावर राग काढायची. माझ्या आईचा कौटुंबिक हिंसाचार झालेला नाही. उलट माझी बहीण आणि माझे वडील यांना आईकडूनच त्रास दिला जायचा. 2020 सालापासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत. माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी ती हे खोटे कृत्य करत असल्याचं पोस्टमध्ये शिशिव धनंजय मुंडेनं म्हणत आपल्या वडिलांची म्हणजेच धनंजय मुंडेंची बाजू घेतलीय.
हेही वाचाः
Karuna Sharma : करुणा शर्मांनी घेतलं बीडमध्ये घर... आता इथून खरी लढाई सुरू...!