चेन्नई Chepauk stadium Pitch for 1st Test : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत चेन्नईच्या मैदानाची खेळपट्टी कशी असेल असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल. चेन्नईत नाणेफेक जिंकल्यानंतर काय करावं? प्रथम फलंदाजी किंवा प्रथम गोलंदाजी... चेपॉकमध्ये नाणेफेक जिंकल्यास रोहित शर्मा काय करेल? इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा रेकॉर्ड खराब आहे.
आतापर्यंत खेळले 34 सामने : भारतीय क्रिकेट संघानं आपला पहिला कसोटी सामना फेब्रुवारी 1934 मध्ये चेपॉक, चेन्नई इथं इंग्लंडविरुद्ध खेळला. या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 202 धावांनी पराभव झाला. त्याच वेळी, भारतीय संघानं फेब्रुवारी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध नुकताच कसोटी सामना खेळला होता. यात त्यांनी इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. भारतीय संघ चेन्नईमध्ये आतापर्यंत एकूण 34 कसोटी सामने खेळला आहे. यात भारतानं एकूण 15 सामने जिंकले आहेत. 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर भारतीय संघाने इथं 11 सामने गमावले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे. आता हे 34 सामने समजून घेतले तर ज्या संघानं प्रथम फलंदाजी केली त्या संघानं 12 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघानं 10 वेळा विजय मिळवला आहे. यात 11 सामने अनिर्णित राहिले आणि 1 सामना बरोबरीत राहिला.
नाणेफेक जिंकत काय करणार : भारतीय संघानं इथं 11 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली आहे. यातील 6 सामने जिंकले आहेत, 1 सामना हरला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघानं इथं प्रथम गोलंदाजी करत एकूण 23 सामने खेळले आहेत. त्यापैकी 9 सामने जिंकले, 6 सामने गमावले, 1 सामना बरोबरीत आणि 7 सामने अनिर्णित राहिले. म्हणजे चेपॉकमध्ये भारतीय संघाला नंतर गोलंदाजी उपयोगी पडणार नाही हे स्पष्ट झालं आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.