T20 World Cup 2024 :टी-20 विश्वचषक 2024 चा 51 वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विश्वचषकातील सुपर-8 मधील उपांत्य फेरीची शर्यत रोमांचक राहिली आहे. सुपर-8 मधील दोन्ही सामने जिंकून भारत सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताला पराभूत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड : टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 31 टी-20 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहीला आहे. भारतानं 19 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियानं 11 सामने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.
- एकूण सामने: 31
- भारत जिंकलेले सामने: 19
- ऑस्ट्रेलियानं जिंकलेले सामने : 11
- रद्द झालेला सामना : 1
टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :भारतीय संघान 2007 साली ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर दोन्ही संघ 2010 साली आमनेसामने आले. तेव्हा ऑस्ट्रेलिया विजयी झाले. 2012 मध्ये ऑस्ट्रेलियानं पुन्हा भारतावर विजय मिळवला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाला अद्याप भारतीय संघाविरुद्ध टी-20 विश्वचषकात जिंकता आलेलं नाही. भारतीय संघानं यंदाच्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला 73 धावांनी धुळ चारली. 2016 साली 6 विकेटनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघ 2021 मध्ये साखळी फेरीतून बाहेर पडला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघानं विजेतेपद पटकावलं होतं. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. तर भारताला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
- एकूण सामने: 5
- भारत जिंकलेले सामने: 3
- ऑस्ट्रेलिया जिंकला: 2
भारत पराभवाचा बदला घेणार? :रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची रोहितसेनेकडे संधी आहे. गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाला 6 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामुळं भारताचं वनडे विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकण्याचं स्वप्न भंगलं. रोहितसेना पराभवाचा बदला घेणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.