मेलबर्न Virat Kohli Finned By ICC :भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासशी भिडताना दिसला. विराट कोहलीला आता असं करणं महागात पडलं आहे. आयसीसीच्या अहवालानुसार विराट कोहलीला आता त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील कोहलीचा हा पहिला डिमेरिट पॉइंट आहे. अशा परिस्थितीत त्याचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण : ऑस्ट्रेलियन डावाची 10 षटकं संपल्यानंतर जेव्हा खेळाडू दुसऱ्या टोकाकडे जात होते, त्याचवेळी कोहली, ज्याच्या हातात चेंडू होता, तो खेळपट्टीच्या बाजूनं निघून गेला पलीकडून येणारा सॅम कॉन्स्टास त्याच्या अंगावर पडला तो कोहलीच्या खांद्यावर आदळला. खांद्यावर मार लागल्यानं कोहली पुढं सरसावला होता, पण यादरम्यान सॅमनं त्याला काही बोलताच कोहलीनं त्याला पुन्हा उत्तर दिले, त्यात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि अशा परिस्थितीत अंपायरला हस्तक्षेप करण्यासाठी पुढे यावं लागलं. सॅम त्याच्या फलंदाजी दरम्यान जोरदार आक्रमक दिसला ज्यामध्ये तो एमसीजीमध्ये उपस्थित चाहत्यांना सतत हातवारे करत होता.