सर्बिया Novak Djokovic Big Claim :सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जोकोविचनं अलीकडेच एक खळबळजनक दावा केला आहे. जोकोविचनं म्हटलं की ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पूर्वी त्याच्या जेवणात विष मिसळण्यात आलं होतं. कोरोना विषाणूमुळं जोकोविचला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यानं लस घेतली नसल्यानं त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आलं. यावेळी त्याच्या जेवणात विष मिसळल्याचा दावा जोकोविचनं केला आहे, त्याच्या या दाव्यानं क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
काय केला खुलासा : खरंतर जोकोविच या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी गेला आहे. यादरम्यान त्यानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. जोकोविचनं एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या जेवणात विष मिसळलं होतं. जोकोविचनं जीक्यू या मासिकाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, "मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये मला विषारी अन्न देण्यात आलं. यामुळं मी आजारी पडलो. जेव्हा मी सर्बियाला परतलो तेव्हा मला कळालं की माझ्या शरीरात जड धातूंचं प्रमाण जास्त आहे. माझ्या शरीरात शिसे आणि पाराचे प्रमाण जास्त आढळले."