मुंबई Hardik Pandya : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपीला नुकतेच त्याच्या लोअर परळ राहत्या घरातून अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी दिलीय. वैभव पांड्या (37) असं आरोपीचं नाव आहे. तो हार्दिक आणि कृणाल पांड्यांचा सावत्र भाऊ आहे.
तीन भावांनी मिळून सुरू केली कंपनी : 2021 मध्ये हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी त्यांचा सावत्र भाऊ वैभवसोबत पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. या कंपनीत हार्दिक आणि कृणाल यांची 40-40 टक्के तर वैभवची 20 टक्के हिस्सेदारी होती. या भागीदारीच्या अटींनुसार, कंपनीचा नफा या आधारावर तिघांमध्ये विभागला जायचा. मात्र, कंपनीचा नफा त्याच्या भावांना देण्याऐवजी आरोपी वैभवनं वेगळी कंपनी स्थापन करुन ती त्याच्याकडे हस्तांतरित केली. त्यामुळं हार्दिक आणि कृणाल पांड्याला 4.3 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. ही बाब हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जाब विचारला. मात्र त्यानं दोघांना धमकी दिली.