पेरु Player Died in Live Match : खेळाच्या मैदानावर अनेक खेळाडूंना अनेकदा जीव गमवावा लागला आहे. दुखापतीमुळं अनेकदा खेळाडूंचा मृत्यू झाल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र पेरुमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळं एका खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.
नेमकं काय घडलं :पेरुमध्ये उव्हेंटुड बेलाविस्ता आणि फॅमिलिया कोका यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता आणि त्यादरम्यान जोरदार पाऊस सुरु झाला. पावसातही फुटबॉलचा खेळ सुरु असतो आणि या मैदानावरही तेच घडत होतं. पण सामन्यादरम्यान आकाशातून वीज पडली आणि अनेक खेळाडूंना त्याचा फटका बसला. या अपघातात एका खेळाडूला जीव गमवावा लागला.
पेरुमध्ये लाइव्ह मॅचमध्ये भीषण अपघात : पेरुमध्ये सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस सुरु झाला, त्यानंतर पंचांनी खेळाडूंना खेळ थांबवून मैदानाबाहेर येण्यास सांगितलं. खेळाडू मैदान सोडत होते पण अचानक आकाशातून वीज पडली आणि 39 वर्षीय खेळाडू जोस ह्यूगो डे आणि ला क्रूझ मेसा यांना त्याचा फटका बसला. मेसाच्या डोक्यात वीज पडल्यानं मैदानावरच त्याचा मृत्यू झाला. तसंच मेसाच्या सहकारी खेळाडूंनाही विजेचा धक्का बसला आणि ते गंभीररित्या जखमी झाले. या खेळाडूंना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.