इंदौर Fastest Century in T20s : IPL 2025 चा मेगा लिलाव होऊन फक्त दोनच दिवस झाले आहेत. सध्या लिलावात सर्वाधिक महागड्या विकल्या गेलेल्या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा आहे. पण जे विकले गेले नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. या दरम्यान, एका भारतीय फलंदाजानं सर्वात वेगवान T20 शतक झळकावलं आहे आणि त्याच्या न विकल्या जाणाऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गुजरातच्या उर्विल पटेलनं हा पराक्रम केला असून त्यानं ऋषभ पंतचा विक्रम मोडला आहे, जो आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. उर्विलनं अचानक हा पराक्रम करुन त्यानं संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी ठरला आणि शेवटपर्यंत आउट झाला नाही.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केला विक्रम : सय्यद मुश्ताक अली ही स्पर्धा सध्या भारतात सुरु आहे. या स्पर्धेत आयपीएलचे खेळाडू आणि भारतीय संघाचे खेळाडू सहभागी होत आहेत. विशेषत: दुखापतग्रस्त भारतीय खेळाडू या स्पर्धेतून पुनरागमन करत आहेत. दरम्यान, आयपीएल संघांचीही या स्पर्धेवर नजर आहे, कारण सय्यद मुश्ताक अली स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाते. आयपीएल फ्रँचायझी या स्पर्धेतून नवीन खेळाडूंची निवड करतात आणि नंतर त्यांच्यावर जोरदार बोली लावतात.
उर्विल पटेलनं 28 चेंडूत झळकावलं शतक :आता उर्विल पटेलबद्दल बोलूया. त्यानं ऋषभ पंतचा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ऋषभ पंत होता. 2018 मध्ये त्यानं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 32 चेंडूत शतक झळकावून सर्व विक्रम मोडीत काढले होते, मात्र आता ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. उर्विल पटेलनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 28 चेंडूत शतक झळकावलं आहे. त्रिपुराविरुद्ध गुजरातकडून खेळताना त्यानं ही कामगिरी केली. विशेष म्हणजे उर्विल पटेल हा देखील पंतसारखा यष्टिरक्षक फलंदाज आहे.