मुलतान Playing 11 Announced : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची खेळवली जात आहे. यातील पहिला सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकल्यामुळं इंग्लंडनं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामनाही मुलतानला खेळवला जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडनं आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यात मोठी अपडेट म्हणजे नियमित कर्णधार बेन स्टोक्सनं संघात पुनरागमन केलं आहे, कारण दुखापतीमुळं तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. तर मॅथ्यू पॉट्सचं संघात पुनरागमन झालं आहे.
दोन खेळाडू बाहेर : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोन खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. यात गस ऍटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश आहे. मुलतानमधील पहिल्या कसोटी सामन्यात ॲटकिन्सन आणि वोक्स यांनी अनुक्रमे 39 आणि 35 षटकं टाकली. दुसरीकडे बेन स्टोक्सच्या पुनरागमनानंतर इंग्लंड संघाला बळ मिळणार आहे. तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. मात्र तो गोलंदाजी करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हॅरी ब्रूकनं झळकावलं पहिल्या कसोटीत त्रिशतक : पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघानं प्रथम फलंदाजी करताना 556 धावा केल्या होत्या. यानंतर गोलंदाज आणि फलंदाजांनी इंग्लंड संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. हॅरी ब्रूकनं त्रिशतक झळकावलं होतं, तर जो रुटनं द्विशतक केलं होतं. त्यामुळं इंग्लंडनं 823 धावा करुन डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि इंग्लंडचे गोलंदाज 10 बळी घेण्यात यशस्वी ठरले. पाकिस्ताननं दुसऱ्या डावात केवळ 220 धावा केल्या आणि पहिल्या कसोटीत संघाचा पराभव झाला.