नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी (Nirmala Sitharaman) आज (१ फेब्रुवारी २०२५) देशाचा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2025) केला. त्यांनी सलग आठव्यांदा बजेट सादर केलं आहे. तर विकासाला गती देणं, सर्वसमावेशक विकास करणं आणि खासगी क्षेत्रात गुंतवणुकीस प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी ही ५ कोटींवरून १० कोटी करण्याची महत्वपूर्ण घोषणा सीतारमण यांनी केली. तर बजेटचं विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनकडून स्वागत करण्यात आलं आहे.
उद्योगांना २० कोटींपर्यंतचं कर्ज देणार : निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्या एमएसएमई वर्गातील उद्योगांना २० कोटींपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. खेळणी उद्योगाच्या विकासासाठी खास योजना आणली जाईल. तसंच भारताला खेळणी उत्पादनांचं जागतिक केंद्र बनवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
सरकारकडून बोल्ड स्टेपची अपेक्षा होती : बजेटच्या माध्यमातून निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगवर विशेष लक्ष देण्याचं धोरण जाहीर केलंय. सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या माध्यमातून देशात ७ कोटी ५० लाख रोजगार मिळाले असून ३५ टक्के उत्पादन केलं जातंय. देशाच्या एकूण निर्यात पैकी ४५ टक्के निर्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या माध्यमातून होत आहे. केंद्र सरकार सूक्ष्म आणि लघु उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत करणार आहे. एमएसएमईला वित्तपुरवठा वाढवणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. देशात सध्या १ कोटी नोंदणीकृत एमएसएमई आहेत. एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचं दुसरं इंजिन असल्याचं देखील सीतारमण यांनी सांगितलं.
बिहारसाठी महत्त्वाच्या घोषणा? : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या आहेत. त्यांनी बिहारमध्ये ग्रीन फील्ड विमानतळ सुरू करण्याची घोषणा केली. तसंच पाटणा विमानतळाची क्षमता वाढविणं आणि उडान योजनेसाठी कनेक्टिव्हिटी वाढविण्याची अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. बिहारमधील हवाई प्रवासाची सतत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, अर्थमंत्र्यांनी ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केलं जाणार आहे. या बोर्डमधून मखानाचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी काम केलं जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलय.
हेही वाचा -