लंडन Ben Stokes Ruled Out : इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सची दुखापत त्याला सोडण्याची चिन्हं दिसत नाहीत. 4 महिन्यांत दुसऱ्यांदा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू पुन्हा दुखापतीनं त्रस्त झाला आहे. ही हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. स्टोक्सला पुन्हा हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून त्यामुळं त्याला 3 महिने क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. बेन स्टोक्सच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सला ही दुखापत झाली होती, ज्यात इंग्लंडचा 423 धावांनी पराभव झाला होता. मात्र, इंग्लंडनं ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.
ऑगस्टमध्येही झाली होती स्टोक्सला दुखापत : बेन स्टोक्सला झालेली हॅमस्ट्रिंगची दुखापत 4 महिन्यांत दुसऱ्यांदा समोर आली आहे. याआधी, त्याला या वर्षी ऑगस्टमध्येही ही दुखापत झाली होती, जेव्हा तो पुरुषांच्या 'द हंड्रेड' लीगमध्ये मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळत होता. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं तो 2 महिने क्रिकेटपासून दूर राहिला.
ईसीबीनं दिली स्टोक्सच्या दुखापतीबाबत माहिती : 33 वर्षीय स्टोक्सचं इंग्लंड संघात पुनरागमन होऊन फक्त एक महिना उलटला होता, जेव्हा त्याच दुखापतीनं त्याला पुन्हा पकडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की तो 3 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. 23 डिसेंबर रोजी स्टोक्सचा स्कॅन अहवाल समोर आल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.
भारताविरुद्ध मालिकेत संघात स्थान नाही :हॅमस्ट्रिंगच्या ताज्या दुखापतीमुळं स्टोक्सची भारताविरुद्धच्या वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड संघात निवड झाली नाही. वैद्यकीय कारणास्तव त्याला संघात स्थान मिळालेलं नाही, असं ईसीबीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. स्टोक्सनं नोव्हेंबर 2023 पासून एकही वनडे सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे स्टोक्स दक्षिण आफ्रिकेतील T20 लीगपासूनही दूर राहणार आहे. आता त्याचं पुनरागमन पुढील वर्षी मे महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होऊ शकते, अशी शक्याता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
- पाहुण्यांचा आफ्रिकेला 'क्लीन स्वीप'... 'प्रोटीज'च्या भूमिवर पहिल्यांदाच पराक्रम
- आगामी कसोटीसाठी 7 'अनकॅप्ड' खेळाडूंचा संघात समावेश; असा कसा निवडला संघ?
- पहिल्याच चेंडूवर षटकार, सर्वात वेगवान अर्धशतक; भारतीय युवा फलंदाजानं केला विश्वविक्रम