नवी दिल्ली IPL 2024 Rishabh Pant : इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसलाय. त्यांचा कर्णधार ऋषभ पंत याला निलंबित करण्यात आलंय. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या स्लो ओव्हर-रेटमुळं ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. तसंच पंतला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.
या कारणामुळं एका सामन्याची बंदी : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 56व्या सामन्यात पंतच्या संघानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटनं गोलंदाजी केली. हा सामना 7 मे 2024 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झाला. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार या हंगामात पंतचा हा तिसरा गुन्हा होता. त्यामुळं ऋषभ पंतला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली. आता प्रभावशाली खेळाडूसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना वैयक्तिकरित्या 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आलाय.
दिल्ली कॅपिटल्सनं दिलं होतं निर्णयाला आव्हान : आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार दिल्ली कॅपिटल्सनं सामनाधिकारींच्या निर्णयाला आव्हान देणारं अपील दाखल केलं होतं. यानंतर हे अपील बीसीसीआय लोकपालकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आलं. यानंतर लोकपालनं या प्रकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. यानंतर मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला गेला.
आयपीएलमधील स्लोओव्हर रेटसाठी कशा प्रकारे दंड आकारला जातो : आयपीएलच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार, जर एखाद्या संघाच्या कर्णधारानं पहिला गुन्हा केला तर त्याला 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. जर त्या कर्णधारानं आयपीएलच्या सीझनमध्ये दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला तर त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. तिसऱ्यांदा हीच चूक झाल्यास कर्णधारावर एका सामन्याची बंदी आणि 30 लाखांचा दंड ठोठावला जातो.
हेही वाचा :
- गुजरातच्या फलंदाजांनी चेन्नईला 'पाजलं पाणी' ; शुभमन गिल, साईसुदर्शनच्या शतकानं रचला इतिहास - GT vs CSK
- आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यात संपुर्ण संघ अवघ्या 12 धावांत गारद; सात फलंदाज तर शुन्यावर बाद - T20 Record