सिंगापूर World Chess Championship: भारताचा युवा स्टार डी गुकेश बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या 14व्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती, जिथं गतविजेता लिरेनने एक छोटीशी चूक केली, जी त्याला महागात पडली. यासह वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी भारताच्या गुकेशनं विश्वविजेता बनून विक्रम केला. विशेष म्हणजे तो 18वा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन देखील आहे.
आनंदनंतर दुसरा भारतीय : डोम्माराजू गुकेशनं जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहासात अनेक पानं जोडली आहेत. तो बुद्धिबळातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. या विजयासह डी गुकेशनं विश्वनाथन आनंदच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. विश्वविजेता बनणारा तो भारतातील दुसरा बुद्धिबळपटू आहे. ही कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद हा पहिला भारतीय खेळाडू आहे.