छत्रपती संभाजीनगर : संगीत महोत्सव म्हटलं की श्रोत्यांची वेगळी पर्वणी मानली जाते. अशीच एक पर्वणी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मिळणार आहे. येथे 'दत्त जयंती संगीत महोत्सव' पार पडणार आहे.
शंभर वर्ष पूर्ण करणारा संगीत महोत्सव : या दत्त जयंती संगीत महोत्सवाचं यंदाचं शताब्दी वर्ष आहे. तर शंभर वर्ष पूर्ण करणारा राज्यातील पहिला तर देशातील दुसरा संगीत महोत्सव असणार आहे. यावेळी संगीत क्षेत्रात नावाजलेले कलावंत येथे कला सादर करणार आहेत. यामुळं यंदा नवीन पिढीला कलेची आवड निर्माण व्हावी याकरिता शाळकरी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
शंभर वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता महोत्सव : "अंबड तालुक्यातील त्रिंबकराव जळगावकर वारकरी संप्रदायाचे होते. त्यांनी शंभर वर्षांपूर्वी खाजगी मोहत्सवला सुरुवात केली होती. हळूहळू या सोहळ्याला मोठे स्वरूप प्राप्त होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांचे पुत्र गोविंदराव जळगावकर यांनी पुढचे स्वरूप देत, त्याला शास्त्रीय संगीताची जोड दिली आणि त्यातून वेगळी ओळख निर्माण झाली. छोट्याशा अंगणात, नंतर मोकळ्या जागेवर होणारा सोहळा आता मोठ्या हॉलमध्ये संपन्न होत आहे. आता तिसरी पिढी आयोजित या सोहळ्याचं आयोजन करत असून चौथी पिढी मदतीला सज्ज झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शास्त्रीय संगीताचं सादरीकरण, गायन, वादन आणि नृत्य यांची रेलचेल आयोजित केली आहे. अतिशय चांगला संगीत सोहळा होत असून रसिकांना आकर्षित करणारा ठरत असल्याची माहिती", आयोजन समितीचे सदस्य विश्वनाथ दाशरथे यांनी दिली.
राज्यातील पहिलाच देशातील दुसरा महोत्सव : "अंबड येथे होणारा दत्ता जयंती संगीत महोत्सव राज्यातील शंभर वर्ष पूर्ण करणारा पहिलाच तर देशातील अशी कामगिरी करणारा दुसरा महोत्सव ठरणार आहे. जालंधर येथील हरी वल्लभ संगीत महोत्सवाने 149 वर्ष पूर्ण केले, पुढील वर्षी 150 वर्ष पूर्ण करणार आहे. त्यानंतर शंभर वर्ष पूर्ण करणारा 'दत्त जयंती महोत्सव' असणार आहे. त्यामुळं वेगळा उत्साह यंदा पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत पंडित जसराज, प्रभा अत्रे, राजन साजन मिश्रा, पंडित सी आर व्यास, मालिनी राजूरकर, आरती अंकलीकर, उस्ताद उस्मान खान, उस्ताद शाहिद परवेज, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी सोहळ्यात उपस्थिती नोंदवत कला सादर केली. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी या महोत्सवात समाविष्ट होत आहे", अशी माहिती आयोजन समिती सदस्य विश्वनाथ दाशरथे यांनी दिली.
नव्या पिढीला संस्कृतीची माहिती देण्यासाठी सोहळा : शंभर वर्षांपूर्वी त्रिंबकराव जळगावकर यांनी सोहळा सुरू केला, त्यावेळी आसपासच्या भजणी मंडळात संगीत, भजन, संप्रदायीक गायन करायचे. जुन्या काळी बैलगाडी भरून लोक येत होती. त्यावेळी कोणताही सोहळा, कार्यक्रम घेण्यासाठी वेळ मर्यादा नव्हती तेव्हा रात्रभर संगीत मेजवानी असायची आणि रात्रभर कार्यक्रम झाल्यावर पहाटे लोक परत जायाचे. शास्त्रीय संगीताची गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न म्हणून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्याला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. यंदापासून नवीन पिढीचा समावेश केला जाणार आहे. लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी याकरिता लहान मुलांना कार्यक्रम पाहण्यासाठी आमंत्रित केल्याची माहिती विश्वनाथ दाशरथे यांनी दिली.
हेही वाचा -